Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन मोजणीस सुरुवात; स्थानिकांमध्ये मात्र संभ्रम कायम

Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन मोजणीस सुरुवात; स्थानिकांमध्ये मात्र संभ्रम कायम

प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गासाठी बांद्यातील जमिनीचे मोजणी काम आजपासून सुरू होत आहे.
Published by :
Rashmi Mane
Published on

प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गासाठी बांद्यातील जमिनीचे मोजणी काम आजपासून सुरू होत आहे. भूमी अभिलेख विभागाने या संदर्भात काही शेतकऱ्यांना नोटिसा पाठवल्या असून, मोजणी प्रक्रिया 21 ते 25 मेदरम्यान पार पडणार आहे. मात्र, बहुतांश शेतकऱ्यांना अद्याप अधिकृत नोटिसा न मिळाल्याने त्यांच्यात मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

स्थानिक ग्रामस्थांनी यापूर्वी विशेष ग्रामसभेत महामार्गाला स्पष्ट विरोध दर्शवला आहे. बांदा गावात घेतलेल्या बैठकीत एकमुखी विरोधाचा ठराव मंजूर करण्यात आला होता. त्यामुळे आजपासून सुरू होणाऱ्या मोजणी प्रक्रियेला स्थानिकांकडून विरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या आधी तांबोळी वडे गावात ग्रामस्थांनी मोजणी प्रक्रिया थांबवली होती.

सावंतवाडीचे प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी नुकतीच डेगवे येथे शेतकऱ्यांशी चर्चा करत महामार्गाच्या कामासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. तरीही स्थानिकांचा विरोध कायम असून, बांद्यात कृती संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली आहे.

महामार्गाच्या आराखड्यात सुरुवातीला 356 शेतकऱ्यांची नावे होती. मात्र त्यानंतर आराखड्यात बदल करण्यात आले. सध्या केवळ काहीच शेतकऱ्यांना नोटिसा मिळाल्या आहेत. तर ग्रामपंचायतीला कोणताही अधिकृत पत्रव्यवहार प्राप्त झालेला नाही. त्यामुळे मोजणीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन व स्थानिकांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com