Darjeeling Heavy Rainfall : दार्जिलिंगमध्ये मुसळधार पाऊस, अतिवृष्टीमुळे भूस्खलन, 28 जणांचा मृत्यू
थोडक्यात
दार्जिलिंगमध्ये मुसळधार पाऊस
28 जणांचा मृत्यू, शेकडो जण अडकले
पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
( Darjeeling Heavy Rainfall) पश्चिम बंगालमधील पर्यटननगरी दार्जिलिंग रविवारी मुसळधार पाऊस कोसळला. सततच्या अतिवृष्टीमुळे डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले असून आतापर्यंत 28 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर शेकडो लोक जखमी असून अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. दार्जिलिंग, मिरिक आणि आसपासच्या गावांमध्ये रस्ते वाहून गेले आहेत, तर काही वस्त्यांशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे.
राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने बचावकार्य युद्धपातळीवर सुरू केले आहे. मिरिक आणि दार्जिलिंग परिसरातील सरसाली, जसबीरगाव, धर गाव, नगराकाटा आणि मिरिक बस्ती येथे सर्वाधिक नुकसान झाले आहे. मिरिकमध्ये 13 आणि दार्जिलिंगमध्ये 7 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 40 हून अधिक लोकांना जिवंत बाहेर काढण्यात बचाव पथकांना यश आले आहे. मुसळधार पावसामुळे मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध घेणे आव्हानात्मक ठरत आहे.
स्थानिक प्रशासनाने सांगितले की, मिरिक-दार्जिलिंग मार्गावरील लोखंडी पूल कोसळल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. सिलिगुडी आणि दार्जिलिंगदरम्यान संपर्क तुटल्याने अन्नसामग्री आणि मदत पोहोचवणे अवघड झाले आहे. दरम्यान, अनेक कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले असून तात्पुरती निवारा केंद्रे आणि मदत शिबिरे उभारण्यात आली आहेत. बचावकार्यात हवामान आणि भूभाग अडथळा ठरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करत नागरिकांना संयम ठेवण्याचे आवाहन केले आहे. त्या आज (सोमवारी) आपत्तीग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने दार्जिलिंग, कालिम्पोंग आणि उत्तर बंगालसाठी रेड अलर्ट जारी केला असून आणखी पावसाची शक्यता वर्तवली आहे.