Ajit Pawar Death : विमान लँडिंगपूर्वीचा शेवटचा फोन कॉल श्रीजीत पवारांना, ऑडिओ क्लिप समोर
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील अकाली निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. प्रशासनावरची घट्ट पकड, निर्णयक्षमता आणि कामाचा झपाटा यासाठी ओळखले जाणारे अजितदादा आता कायमचे शांत झाले आहेत. मात्र त्यांच्या निधनापूर्वीचा शेवटचा फोन कॉल आणि त्या संवादातील आशय सध्या संपूर्ण राज्यात भावनिक चर्चेचा विषय ठरत आहे. बारामती येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात अजित पवार यांची शेवटची ऑडिओ क्लिप ऐकवण्यात आली. ती ऐकताना कार्यकर्त्यांच्या डोळ्यांतून अश्रू अनावर झाले.
अजित पवार यांनी विमान लँडिंगच्या काही मिनिटे आधी हा शेवटचा फोन केला होता. काटेवाडी येथील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते श्रीजीत पवार यांच्याशी हा संवाद झाला. श्रीजीत यांनी सांगितले की, सकाळी ८ वाजून १९ मिनिटांनी त्यांनी एका कामासंदर्भात अजितदादांना मेसेज पाठवला होता. विमान हवेत असल्याने लगेच उत्तर मिळाले नाही. मात्र विमान लँडिंगसाठी जवळ येताच नेटवर्क मिळाल्यानंतर अजित पवार यांनी तत्परतेने ८ वाजून ३७ मिनिटांनी स्वतः कॉल केला. ही बाब त्यांच्या कामावरील निष्ठा आणि प्रत्येक कार्यकर्त्याशी असलेल्या थेट संवादाची साक्ष देणारी ठरते.
हा संवाद सुमारे एक मिनिटाचा होता, पण त्यातून अजित पवार यांची राजकीय भूमिका, सामाजिक समतोल आणि सर्वसमावेशकतेची भूमिका स्पष्टपणे दिसून येते. संभाषणात माळी समाजाच्या नेतृत्वाबाबत चर्चा झाली. अजित पवार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, दिगंबर दुर्गाडे यांना जिल्हा बँकेचे चेअरमन बनवण्याचा निर्णय त्यांनी स्वतः घेतला होता आणि राजकारण करताना सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाणे हीच त्यांची भूमिका आहे. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुपे गटातून माळी समाजाला उमेदवारी दिल्याचाही त्यांनी उल्लेख केला.
श्रीजीत पवार यांनी सांगितले की, “मी इतका महत्त्वाचा नव्हतो की लँडिंगच्या वेळी दादांनी मला फोन करावा. पण प्रत्येक मेसेजला उत्तर देण्याचा त्यांचा स्वभाव होता.” या वाक्यातून अजित पवार यांच्या नेतृत्वशैलीची झलक मिळते. मोठ्या पदावर असूनही सामान्य कार्यकर्त्याशी थेट संवाद साधणे, त्याची बाजू समजून घेणे आणि वस्तुस्थिती स्पष्ट करणे, ही त्यांची ओळख होती.
या फोन कॉलनंतर काहीच वेळात नियतीने घात केला आणि संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला. बारामतीसह राज्यभरात अजित पवार यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे. “दादांचा शेवटचा आवाज ऐकायला मिळावा, हीच कार्यकर्त्यांची भावना होती म्हणून ही ऑडिओ क्लिप ऐकवली,” असे श्रीजीत पवार यांनी सांगितले. अजित पवार यांचा कामाचा व्याप, शेवटच्या क्षणापर्यंत समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन जाण्याची जिद्द आणि निर्णयक्षम नेतृत्व हे त्यांच्या शेवटच्या संवादातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. हा शेवटचा फोन कॉल केवळ एक संभाषण न राहता, त्यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीचे प्रतिबिंब ठरत आहे.
