Mumbai Local Train : वसई–नालासोपारा दरम्यान लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांचा मोठा खोळंबा
मुंबई उपनगरी रेल्वे सेवेचा कणा मानल्या जाणाऱ्या पश्चिम रेल्वे मार्गावर आज सकाळी मोठा तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांचे हाल झाले. वसई–नालासोपारा रेल्वे स्थानकादरम्यान, कॅपिटल मॉलजवळ विरारहून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या एका लोकल ट्रेनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. या बिघाडामुळे पश्चिम रेल्वेची लोकल सेवा पूर्णतः विस्कळीत झाली असून, अनेक लोकल ट्रेन तासाभरापासून खोळंबलेल्या अवस्थेत होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळच्या गर्दीच्या वेळेत ही घटना घडल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. संबंधित लोकल ट्रेन अचानक थांबल्यामुळे मागील आणि पुढील मार्गावरील अनेक लोकल ट्रेनही थांबवण्यात आल्या. परिणामी, विरार ते चर्चगेट या दिशेतील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. काही लोकल ट्रेन नालासोपारा, वसई रोड आणि विरार स्थानकांवरच अडकून राहिल्या.
ब्रेक डाऊन झालेल्या ट्रेनमधील प्रवाशांना बराच वेळ ट्रेनमध्येच थांबावे लागले. मात्र, तासाभराहून अधिक वेळ लोटूनही समस्या सुटण्याची चिन्हे न दिसल्याने अनेक प्रवाशांनी ट्रेनमधून खाली उतरून नालासोपारा स्थानकाच्या दिशेने रेल्वे ट्रॅकवरून चालत जाण्याचा धोकादायक निर्णय घेतला. या प्रकारामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रेल्वे ट्रॅकवरून चालणाऱ्या प्रवाशांमुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली होती.
घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्रवाशांना सुरक्षित अंतर ठेवण्याचे आवाहन करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर रेल्वेचे तांत्रिक कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. बिघाड नेमका कशामुळे झाला याचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले असून, तांत्रिक दुरुस्तीचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
या घटनेमुळे कार्यालयीन वेळेत प्रवास करणाऱ्या हजारो चाकरमान्यांचे हाल झाले. अनेक प्रवासी कामावर उशिरा पोहोचले, तर काही प्रवाशांना पर्यायी वाहतूक व्यवस्थेचा आधार घ्यावा लागला. बस, रिक्षा आणि खासगी वाहनांवर प्रवाशांची गर्दी वाढल्याचे चित्र पाहायला मिळाले. दरम्यान, वारंवार होणाऱ्या तांत्रिक बिघाडांमुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. ‘दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेचा आणि वेळेचा विचार रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने करावा,’ अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. लोकल सेवा सुरळीत करण्यासाठी तांत्रिक देखभाल आणि आपत्कालीन व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याची गरज पुन्हा एकदा या घटनेमुळे अधोरेखित झाली आहे.
