डीझेलकडे दुर्लक्ष करणे पडले महागात! वाहतूक कोंडीस कारणीभूत म्हणून थेट गुन्हा दाखल

डीझेलकडे दुर्लक्ष करणे पडले महागात! वाहतूक कोंडीस कारणीभूत म्हणून थेट गुन्हा दाखल

आपल्या वाहनात इंधन किती आहे याचा अंदाज न आल्याने एका ट्रक चालकाला चांगलाच आर्थिक फटका

हर्षल भदाणे पाटील | नवी मुंबई : शीव-पनवेल मार्गावर डीझेल संपल्याने एक डंपर बंद पडला. त्यामुळे झालेल्या वाहतूक कोंडी झाल्याने ट्रक चालकाविरोधात थेट गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा जास्त असल्याचे लक्षात आल्याने ३० हजार रुपयांचा दंड बसला. याशिवाय ९० दिवसांसाठी वाहन चालवण्याचा परवाना रद्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे डीझेलकडे दुर्लक्ष करणे ट्रक चालकाला चांगलेच महागात पडले आहे. शनिवारी सकाळी साडे नउच्या सुमारास ही घटना घडली आहे.

आपल्या वाहनात इंधन किती आहे याचा अंदाज न आल्याने एका ट्रक चालकाला चांगलाच आर्थिक फटका बसला आहे. शनिवारी सकाळी हाशीम पटेल यांचा डंपर (एमएच ४६ बी यु ४८४८ ) चालक अनिल मसुरकर हा चालक नवी मुंबई नियोजित विमानतळ येथून दगड घेऊन खारघर येथे घेऊन जात होता. सीबीडी येथील उड्डाण पुलावर पुणे मार्गिकेवर हा डंपर बंद पडला. त्यामुळे सुमारे तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या व प्रचंड मोठी वाहतूक कोंडी झाली होती. तांत्रिक बिघाड झाल्याने डंपर बंद पडला असेल म्हणून वाहतूक पोलिसांनी सदर डंपर बाजूला घेण्यासाठी प्रयत्न सुरु केले.

मात्र, वाहन चालक याने डीझेल संपल्याने डंपर बंद पडल्याचे सांगितल्यावर वाहतूक पोलिसांनी डोक्यावर हात मारून घेतला. ही वाहतूक कोंडी सोडवण्यास सुमारे दोन तास गेले. त्यामुळे पोलिसांनी वाहन चालकाविरोधात निष्काळजीपणाने वाहन चालवण्याने वाहतूक कोंडीस कारण ठरला म्हणून गुन्हा दाखल केला. तसेच, यावेळी डंपरमध्ये मोठ्या प्रमाणात दगड असल्याचे लक्षात आल्याने वजन तपासण्यात आले. त्यावेळी क्षमतेपेक्षा अधिक असल्याचे निदर्शनास आल्याने ३० हजार ५०० रुपयांचा दंडही ठोठावला आहे. तसेच ९० दिवस परवाना रद्द करण्याचे निर्देशही उपप्रादेशिक परिवहन विभागाला देण्यात आले आहेत.

शीव-पनवेल मार्गावर बेशिस्तीने वाहन चालवल्याने वाहतूक कोंडी होत असून वाहतूक नियमांची पायमल्ली करून बेजाबदारपणे वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांच्या विरोधात वेळोवेळी कारवाई अधिक कडक करण्यात आली आहे. त्यामुळे वाहतुकीचे नियम पाळून वाहन चालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जगदीश शेलकर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहतूक विभाग) यांनी केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com