Crime
CrimeTeam lokshahi

झोपू देत नसल्याचा रागातून सहकारी कामगाराची हत्या; आरोपी गजाआड

अवघ्या दहा तासात शांतीनगर पोलिसांना हत्या करणाऱ्या आरोपीस बेड्या ठोकण्यात यश आले आहे.

अभिजीत हिरे |भिवंडी : येथील सायझिंग कारखान्यात झोपण्याच्या जागेवरील वादातून कामगाराने वयस्क कामगाराची हत्या केल्याची घटना घडली आहे. यानंतर अवघ्या दहा तासात शांतीनगर पोलिसांना शिताफीने माहिती घेऊन हत्या करणाऱ्या आरोपीस बेड्या ठोकण्यात यश आले आहे. शेरबहाद्दूर श्यामराज सिंग (वय 33) असे आरोपीचे नाव असून इकबाल अहमद मोहम्मद शकीब अन्सारी (वय 60) असे हत्या झालेल्या वयस्क कामगारांचे नाव आहे.

11 ऑगस्ट रोजी शांतीनगर पोलीस ठाणे हद्दीतील खान कंपाऊंड येथील वफा सायझिंगमध्ये झोपलेल्या कामगाराची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना सकाळी उघडकीस आली होती. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत हे पोलीस फौजफाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी माहिती घेण्यास सुरुवात केली असता त्या ठिकाणी काम करणारा एक कामगार पसार असल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलीस पथकातील या पोलिसांनी संशयित आरोपीबाबत माहिती मिळवली असता जब्बार कंपाऊंड येथील एका बंद असलेल्या यंत्रमाग कारखान्यात तो लपून बसलेला आढळून आला.

पोलिसांनी त्यास ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने मयत इसम हा झोपण्यास जागा देत नसे, झोपल्या नंतर मारहाण करायचा व आरोपीचे मोबाईल व घड्याळ मयताने चोरल्याचा संशय बाळगून ही हत्या केल्याचे कबुल केले आहे. पोलिसांनी या गुन्ह्यात कोणताही सुगावा नसताना अवघ्या दहा तासात हत्या करणाऱ्या आरोपीस बेड्या ठोकल्या हे विशेष.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com