गणपती आगमनासाठी भाविक आतुर; यंदा बाप्पाच्या मूर्ती वीस टक्क्यांनी महागणार

गणपती आगमनासाठी भाविक आतुर; यंदा बाप्पाच्या मूर्ती वीस टक्क्यांनी महागणार

लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन अवघ्या 8 दिवसांवर येऊन ठेपले

आदेश वाकळे | संगमनेर : सर्व लहानांपासून ते जेष्ठांपर्यंत आतुरतेने ज्याची सर्वजण वाट पाहत असतात. त्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन अवघ्या 8 दिवसांवर येऊन ठेपले असताना मूर्तिकार गणेशोत्सवाकरिता लागणाऱ्या मूर्तीवर अखेरचा हात फिरवत आहेत. मोठ्या मूर्तींना मागणी घटली असून त्यातच कच्चा मालाच्या दरात वाढ झाल्याने यंदा किमतीत दहा ते वीस टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.

गणेश मूर्ती तयार करण्यासाठी शाडूची माती किवा प्लॅस्टर ऑफ पॅरिस वापरले जाते. तर, पर्यावरण पूरक नैसर्गिक रंगांचा अधिक वापर करण्यावर भर दिला जात आहे. गणेश मूर्ती तयार करण्यासाठी मूर्तीमध्ये लालबागचा राजा, दगडूशेठ हलवाई मूर्तीची तयारी पूर्ण झाली असून सार्वजनिक मंडळांच्या मोठ्या मूर्तींची देखील रंगरंगोटी पूर्ण झाली आहे. हलवाई आणि अष्टविनायक गणपतींच्या मूर्तींना अधिक मागणी आहे.

राजूरचे प्रसिद्ध मूर्तिकार भालेराव बंधू यांनी सांगितले की, गेली दोन वर्षे कोरोना रोगाच्या आपत्तीने सण-उत्सवावर निर्बंध आल्याने फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. यामुळे मोठ्या मूर्तींना मागणी घटली. त्यातच कच्चा माल दरात वाढ झाल्याने यंदा किमतीत दहा ते वीस टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. कारागिरांच्या मानधनात वाढ तसेच रंग, काथ्या, दाग-दागिन्यांची सजावट, प्लॅस्टर ऑफ पॅरिस या साहित्यांच्या दरात वाढ झाल्याने थोडी वाढ निश्चित होणार आहे. गणेशोत्सवाला आता फक्त 8 दिवस बाकी आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com