फलाट नसलेल्या मार्गावर दिवा-रोहा रेल्वे थांबवली; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

फलाट नसलेल्या मार्गावर दिवा-रोहा रेल्वे थांबवली; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

पनवेल स्थानकात दिवा-रोहा गाडी पकडताना मोठी दुर्घटना टळली. याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याची अभिजीत पाटील यांची मागणी केली आहे.

हर्षल भदाणे पाटील | नवी मुंबई : पनवेल स्थानकात शनिवारी ८ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास दिवा-रोहा गाडी पकडताना मोठी दुर्घटना टळली. यावेळी पनवेल स्थानकात निर्माण झालेल्या गोंधळाला नेमके जबाबदार कोण, याची चौकशी होणे गरजेचे आहे. या अनुषंगाने पनवेल रेल्वे स्थानकात फलाट नसलेल्या मार्गावर दिवा-रोहा पॅसेंजर गाडी थांबवल्याप्रकरणी मध्य रेल्वेने समिती नेमून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशा मागणी मध्य रेल्वे सल्लागार समिती सदस्य अभिजीत पाटील यांनी मध्य रेल्वे जनरल मॅनेजर, भारत सरकार यांच्याकडे केली आहे.

पनवेल रेल्वे स्थानकात दररोज लांब पल्ल्याच्या गाड्यांची मोठी वर्दळ असते. त्यातच रोज सकाळी गाडी पकडण्यासाठी पनवेल रेल्वे स्थानकात मोठ्या संख्येने प्रवासी ये-जा करत असतात. शनिवारी सकाळी दिवा- रोहा या गाडीने अचानक ट्रॅक बदलल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आणि गाडी पकडण्याच्या नादात प्रवाशांनी जीवाची पर्वा न करता रेल्वे रूळ ओलांडला. या निर्माण झालेल्या गोंधळाला जबाबदार कोण? ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. अशा प्रकारे रेल्वे प्रशासनाकडून गोंधळ होतोच कसा? असा सवाल करत अभिजीत पाटील यांनी मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर अनिल कुमार लाहोटी यांना लेखी पत्र देखील पाठवले आहे.

अभिजीत पाटील यांनी जनरल मॅनेजर, मध्य रेल्वे-भारत सरकार यांना दिलेल्या पत्रात पनवेल रेल्वे स्थानकावर शनिवारी दिवा-रोहा पॅसेंजर रेल्वे पकडण्यासाठी प्रवाशांनी फलाटावरून उड्या मारून मालगाडीवर चढून रेल्वे पकडली. पनवेल स्थानकात दिवा-रोहा पॅसेंजर फलाट क्रमांक ५ वर थांबणार होती. आणि रेल्वे काही सेकंदातच सुटणार असल्याने प्रवाशांनी गाडी पकडण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता रेल्वे रूळ ओलांडण्यास सुरुवात केली. सुदैवाने यादरम्यान रेल्वे रूळ ओलांडताना या मार्गावर एखादी जलद गाडी न आल्यामुळे मोठा अनर्थ टळला असल्याचे म्हंटले आहे.

फलाट नसलेल्या मार्गावर दिवा-रोहा रेल्वे थांबवली; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
Western Railway वर 20 जूनपासून धावणार एसी लोकलच्या 40 फेऱ्या, पाहा वेळापत्रक
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com