'हाफकीन' माणसाला बॅन करा; आरोग्यमंत्र्यांच्या अजब वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा

'हाफकीन' माणसाला बॅन करा; आरोग्यमंत्र्यांच्या अजब वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा

युझर्सने तानाजी सावंत यांना केले ट्रोल

मुंबई : शिंदे सरकारचे नवनिर्वाचित आरोग्यमंत्री तानाजी सावंत सध्या चांगलेच चर्चेत आहेत. नुकताच त्यांनी पुण्यातील ससून शासकीय रुग्णालायाचा दौरा केला होता. यादरम्यानच्या प्रसंग सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून युझर्सकडून तानाजी सावंत यांना ट्रोल करण्यात येत आहे.

तानाजी सावंत यांच्या दौऱ्याचे एक वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. यात पुण्यातल्या ससून रुग्णालयात एका कॅबिनेट मंत्र्याने भेट दिली. मंत्र्यांचा दौरा रुग्णालयात आलेल्या रुग्णांकडे वळला. मध्येच डॉक्टरांवरही प्रश्नांची सरबत्ती केली जात होती. रुग्णालयात कमी पडणाऱ्या औषधांबद्दल मंत्रिमहोद्य म्हणाले की, तुम्ही त्या हाफकीन माणसाकडून औषधं घेता ते आधी बंद करा.

हे वाक्य ऐकताच डॉक्टरांना हसू आवरेनाच. पण ते मंत्री महोदय होते. शेवटी मंत्र्यांच्या पीएने हळूच सांगितले की, हाफकीन ही शासकीय संस्था आहे. माणूस नाही. तेव्हा त्यांनी तेथून काढता पाय घेतला, अशा आशयाचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. यावरुन नेटकऱ्यांनी आता तानाजी सावंत यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. तर, काहींनी कोरोना काळात राजेश टोपे आरोग्यमंत्री होते, याबद्दल आभार मानले आहेत.

दरम्यान, तानाजी सावंतांना याआधीही सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल करण्यात आले होते. अलीकडेच तानाजी सावंत यांच्या पुण्यातील दौऱ्याचा कार्यक्रम जिल्हा माहिती कार्यालयाकडून जाहीर करण्यात आला होता. परंतु, घर ते कार्यालय आणि कार्यालय ते घर असा दौऱ्याचा तपशील पाहून अनेकांना हसू फुटले होते. तर, पावसाळी अधिवेशनात आरोग्य खात्यासंदर्भातील अजित पवार यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देताना तानाजी सावंत यांची भंबेरी उडाली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com