संगमनेरमध्ये परतीच्या पावसाचा हाहाकार; उभी पिके पाण्यात, घराच्या भिंती कोसळल्या

संगमनेरमध्ये परतीच्या पावसाचा हाहाकार; उभी पिके पाण्यात, घराच्या भिंती कोसळल्या

रस्ते वाहून गेले, शेतबांध फुटले

आदेश वाकळे | संगमनेर : तालुक्याच्या पठारभागात बुधवारी सायंकाळपासून ते गुरूवारी पहाटेपर्यंत परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. यामुळे उभी पिके पाण्यात शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत वाहून गेले असून घराच्या भिंती कोसळून मोठे नुकसान झाले आहे.

परतीच्या सतत मुसळधार पावसाने पठार भागात हाहाकार माजला आहे. पठार भागातील बोटा, घारगाव, नांदुर, जांबुत, साकुर, रनखांब, पिंपळगाव देपा, सारोळे पठार, अकलापुर, कुरकुटवाडी, बेलापुर परिसरातील गावांमध्ये सर्वत्र पाणीच पाणी झाले. तर ओढे- नाले तुडुंब भरून वाहू लागले. अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने गावांसह वाड्या-वस्त्यांचे संपर्कही देखील तुटले आहे.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पठारभागात धुव्वादार पावसाने हजेरी लावली आहे. त्यात पुन्हा पहाटे तुफान पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. कधी न वाहणारे ओढे- नाले तुडूंब भरून वाहू लागले असून शेतांमध्येही मोठ्या प्रमाणात पाणीच पाणी साचल्याने शेतीचे बांध फुटून गेले आहे. त्याच बरोबर शेतातील मातीही वाहून गेली आहे. तसेच अनेक गावांमधील मातीच्या असलेल्या घरांच्या भिंती पडल्या आहेत. तर काही ठिकाणी रस्तेही वाहून गेल्याने सर्वसामान्य नागरिकांचे मोठे हाल झाले आहे.

Lokshahi
www.lokshahi.com