जेवणाचा डबा न दिल्याच्या रागातून पतीने पत्नी-मुलीवर डिझेल ओतून पेटवण्याचा प्रयत्न
सातारा : जेवणाचा डबा न दिल्याच्या रागातून पतीने पत्नी आणि मुलीच्या अंगावर डिझेल ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सातारा जिल्ह्यातील आझादपूर येथे ही घटना घडली आहे. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आरोपीला गजाआड केले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली होती.
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील आझादपूर येथे राहत्या घरात जेवणासाठी डबा दिला नाही म्हणून चिडलेल्या पतीने पत्नी आणि मुलीच्या अंगावर डिझेल ओतले व काडीपेटीतील काडी पेटवून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पत्नीने कोरेगाव पोलिस ठाण्यात पतीविरोधात गुन्हा नोंदवला आहे. हा प्रकार सोमवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास प्रकार घडला असून मंगळवारी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. कोरेगाव पोलिसांनी मारेकरी पतीला तात्काळ अटक केली असून उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार अधिक तपास करीत आहेत.