Narayan Rane vs Vinayak Raut | कोकणात दोन खासदार भिडले!; सिंधुदुर्गात भर बैठकीत ‘धुमशान’

Narayan Rane vs Vinayak Raut | कोकणात दोन खासदार भिडले!; सिंधुदुर्गात भर बैठकीत ‘धुमशान’

Published by :

लोकशाही न्यूज नेटवर्क

भाजप खासदार नारायण राणे आणि शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यातील वाद संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. दोघेही एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडत नाही. या लढाईत सिंधुदुर्ग हा नेहमीच केंद्रबिंदू राहिलेला आहे. भाजपचे राज्यसभा सदस्य नारायण राणे आणि शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यात या बैठकीत जोरदार शाब्दिक चकमक झडली. त्यामुळे सभागृहात तणावाची स्थिती निर्माण झाली.

सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीची बैठक आज पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीला स्थानिक खासदार विनायक राऊत, नारायण राणे, आमदार नितेश राणे, वैभव नाईक व अन्य प्रमुख लोकप्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत भाजपचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजन म्हापसेकर यांनी तिलारी धरणाचा डावा कालवा फुटल्यावरून आपली भूमिका मांडली. त्यावर शिवसेनेचे सदस्य बाबुराव धुरी यांनी जोरदार आक्षेप घेतला. यात मग विनायक राऊत आणि नारायण राणे या दोघांनीही उडी घेतल्याने वादाची ठिणगी पडली.

नारायण राणे आपल्या जागेवरून उठले. पाठोपाठ नितेश राणेही उभे राहिले आणि विनायक राऊत यांच्याशी त्यांनी जोरदार वाद घातला. राणे बोटाने इशारा करत राऊत यांना सुनावत होते. कालवा फुटल्यानंतर तिथे अधिकारी वेळेत पोहचले नाहीत, असा मूळ आक्षेप होता. त्यात राणे यांनी काही जिल्हा परिषद सदस्यांचा एकेरी उल्लेख केल्याने वाद अधिक चिघळला. विनायक राऊत हेसुद्धा जागेवरून उभे राहिले व त्यांनी राणे यांना प्रत्युत्तर दिले. त्यानंतर दोघांच्या समर्थकांनीही सभागृहात गदारोळ सुरू केला.

तणाव वाढत असल्याचे लक्षात घेऊन मग पालकमंत्री उदय सामंत यांनी हस्तक्षेप केला व सर्वांना शांतता बाळगण्याची विनंती केली. तिलारी धरणाचा जो कालवा फुटला आहे त्याबाबत संबंधित विभागाची बैठक घेतली जाईल व प्रश्न निकाली काढला जाईल, असे आश्वासन सामंत यांनी दिले. त्यानंतर वातावरण निवळले.

दरम्यान, नारायण राणे व त्यांचे दोन पुत्र नितेश राणे व निलेश राणे यांनी गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेवरील हल्ले तीव्र केले आहेत. त्यातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सातत्याने लक्ष्य करण्यात येत आहे. त्यामुळे शिवसेना नेते आणि राणे कुटुंबातील सदस्यांमध्ये गेले काही दिवस सातत्याने खटके उडत आहेत. कधी सोशल मीडियातून तर कधी भाषणांतून एकमेकांवर चिखलफेक केली जात आहे. ही लढाई आज भर बैठकीत पाहायला मिळाली असून या राड्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com