Dead Body
Dead BodyTeam Lokshahi

मुख्यमंत्री शिंदेंच्या विभागात ऑक्सिजनअभावी रुग्णाचा मृत्यू

सुविधा नसल्याने या परिसरातील रूग्णांवर जीव गमावण्याची वेळ येत आहे

प्रशांत जगताप | सातारा : जिल्ह्यातील कोयना विभागातील तापोळा येथील 108 ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन मास्क उपलब्ध न झाल्याने एका रुग्णाचा मृत्यू धक्कादायक माहिती समोर येत आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या विभागातच ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याने चर्चेचा विषय ठरत आहे.

शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख हरिभाऊ सपकाळ यांचे बंधू मारुती रामदेव सपकाळ यांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला. तापोळा गावापासून हाकेच्या अंतरावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दरे तांब हे गाव आहे.

दुर्गम, डोंगराळ तापोळा गावात 108 ॲम्बुलन्समध्ये सुविधा व्यवस्थित नाहीत. ऑक्सिजनसह इतर सुविधा नसल्याने या परिसरातील रूग्णांवर जीव गमावण्याची वेळ आली आहे. तरीही प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या गावाला भेट दिली होती. या ठिकाणी विशेष वैद्यकीय कक्ष देखील सुरू करण्यात आला आहे. मात्र 108 ॲम्बुलन्समधील सुविधांकडे प्रशासनाचा कानाडोळा होत आहे. याबाबत स्थानिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

याबाबत वेळापूर गावचे सरपंच राम सपकाळ यासह तापोळा गावचे सरपंच आनंदा धनावडे यांनी संबंधितांना जाब विचारला. मात्र त्या ठेकेदाराने उडवाउडवीची उत्तरे दिली. भोंगळ कारभारावर आता मुख्यमंत्र्यांना स्वतः लक्ष घालून सुधारावा लागणार अशी स्थिती या विभागात झाली आहे.

Lokshahi
www.lokshahi.com