alcohol
alcoholTeam Lokshahi

पोलीस अ‍ॅक्शन मोडवर! वर्ध्यात बोगस दारू निर्मितीचा कारखाना; दारू विक्रेत्यांची पळापळ

बनावट दारूचा लाखो रुपयांचा दारूसाठा जप्त, पोलीस अधीक्षकांनी केली पाहणी

भूपेश बारंगे | वर्धा : जिल्ह्यात 1975 साली दारूबंदी करण्यात आली. त्यानंतर मात्र या जिल्ह्यात दारूबंदी ही नावालाच राहली. आजही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री केली जाते. अवैधरित्या दारूविक्रेत्यावर अनेकदा पोलीसाकडून कारवाईही केली जाते. मात्र, या कारवाईला न जुमानता पुन्हा दारू विक्रेत्याकडून दारूविक्री केली जात आहे.

काही ठिकणी तर विषारी, बोगस, बनावट दारूची निर्मिती विक्री केली जात असल्याचे उघड झाले आहे. आज क्राईम इंटेलिजन्स पथकाने बनावट दारू निर्मितीच्या दारूचा कारखान्यावर धाड टाकून लाखो रुपयांचा दारूसाठा जप्त केला आहे. या कारखान्याची चक्क पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्याकडून पाहणी केली असून संपूर्ण परिसराची पाहणी केली आहे. सध्या वर्ध्यात दारूविक्रेत्यांना सळो की पळो करून सोडलं असल तरी दारू विक्री थांबायच नाव घेत नाही.

नुकताच पोद्दार बगीचा परिसरातील एका घरात आलिशान बार असल्याची माहिती क्राईम इंटेलिजन्स पथकाला मिळताच त्याठिकाणी धाड टाकून दारूसाठा जप्त करत सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पूर्ण होत नाही, तर सावंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चिंतामणी अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या बनावट दारूचा कारखाना पोलिसांच्या हाती लागला. यात बनावटी दारूच्या हजारो खाली बाटल्या आणि दारूत मिसळविणारे द्रव्य तसेच सील आणि लेबल आढळून आले. याचवेळी पोलिसांना अनेक धक्कादायक खुलासे केले आहे.

आरोपी विशाल भगत हा चिंतामणी अपार्टमेंट मध्ये राहतो. त्याच्या फ्लॅट समोरील एका बंद फ्लॅट मध्ये दार तोडून त्या रूममध्ये बनावट दारूचा कारखाना सुरू होता. येथे दारूच्या बाटल्यामध्ये बनावट द्रव टाकून 'ओरिजनल' दिसेल अशी दारू तयार करायचा. अन रिकाम्या बाटल्यांमध्ये बनावट दारू टाकून 'सील बंद' करून इतरत्र विक्री करायचा. आरोपी विशाल भगत सध्या फरार असून लवकरच आरोपीला अटक करण्यात येणार असल्याचे पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी सांगितले. जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी बनावट दारूचा कारखाना असल्याचा संशय असल्याने इतर ठिकाणी धाडस्त्र टाकून कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कापडे, पोलीस निरीक्षक धनाजी जळक, दिनेश बोथकर, राकेश इतवारे, सागर भोसले,धीरज राठोड, अनुप कावळे, मंगेश आदे, पवन देशमुख, अभिषेक नाईक, अरविंद इंगोले यांनी केली.

बापरे.. बनावट दारूचा कारखाना!

जिल्ह्यातील दारूबंदी असल्याने दारूविक्रेते नवनवी शक्कल लढवून दारूची अवैध विक्री केली जाते. यातच नागरिकांच्या जीवाशी खेळ करत बनावट दारू विक्री केली जात असल्याने अनेक युवा पिढी या दारूच्या व्यसनी जाऊन आपलं जीवन उध्वस्त केले जात आहे.अनेकांना आपला या विषारी, बनावट दारूमुळे जीवही गमवावा लागला आहे. जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी दारूचे बार आहे. तर काही ठिकाणी चक्क बनावट दारूचे कारखाने थाटले आहे. याबाबत जिल्ह्यातील पोलिसांना माहिती नसेल हे तर कोड आहे.मात्र नव्याने आलेलं पोलीस अधीक्षक या दारूविक्रेत्यांवर आळा घालण्याचा प्रयत्न केला जात असून याला कितीपत यश येईल, हे येणारा काळच ठरवेल!

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com