पुष्पा स्टाईल दारू तस्करी; उत्पादन शुल्क विभागाचा छापा, 2 हजार लीटर मद्य जप्त

पुष्पा स्टाईल दारू तस्करी; उत्पादन शुल्क विभागाचा छापा, 2 हजार लीटर मद्य जप्त

पुष्पा स्टाईल दारू तस्करी करणाऱ्या टोळीचा राज्य उत्पादन शुल्क विभागाने पर्दाफाश केला आहे.

नागपूर : पुष्पा स्टाईल दारू तस्करी करणाऱ्या टोळीचा राज्य उत्पादन शुल्क विभागाने पर्दाफाश केला आहे. एका ट्रकमध्ये छुपा कप्पा बनवून लाखो रुपयांची दारू तस्करी करण्यात येत होती. याप्रकरणी एकाला अटक केली आहे. परंतु, त्याच्या अन्य साथीदारांना पळून जाण्यात यश आले, पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.

दारू तस्करी करणाऱ्या टोळीचा राज्य उत्पादन शुल्क विभागाने पर्दाफाश केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात वडद परिसरात मद्य तस्करी केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर विभागाच्या विशेष पथकाने सबंधित ठिकाणी छापा टाकून 2 हजार लिटर स्पिरिट म्हणजेच शुद्ध मद्यार्क जप्त केले आहे.

विशेष म्हणजे तस्करीसाठी वापरलेल्या या ट्रकमध्ये ड्रायव्हरची केबिन आणि पाठीमागची ट्रॉली यादरम्यान विशेष जागा बनवून मद्य तस्करी केली जात होती. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने संशयाच्या आधारावर ट्रक थांबवून त्याची तपासणी केली. तेव्हा ट्रकची एकूण लांबी खूप जास्त असतानाही त्याची ट्रॉली तुलनेने कमी लांबीची असल्याचे पथकाच्या लक्षात आले.

अधिकाऱ्यांनी ट्रकच्या ट्रॉलीमध्ये चढून तपासणी केली. तेव्हा ड्रायव्हरची केबिन आणि ट्रॉलीच्या मध्ये विशेष कप्पा बनवण्यात आल्याचे दिसून आले. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी नटबोल्ट उघडून त्या भागाची तपास केला असता त्या ठिकाणी दहा ड्रम शुद्ध मद्यार्क म्हणजेच स्पिरिट लपवण्यात आल्याचे उघड झाले.

दारूची अवैध निर्मिती करण्यासाठी हे स्पिरीट वापरले जाणार होते. राज्य उत्पादन शुल्क विभागाने याप्रकरणी एका व्यक्तीला अटक केली आहे. तर इतर आरोपी फरार झाले आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाने 30 लाख रुपयांचा मुद्देमाल याप्रकरणी जप्त केला आहे.

Lokshahi
www.lokshahi.com