Shivshahir Babasaheb Purandare passes away | शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन

Shivshahir Babasaheb Purandare passes away | शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन

Published by :

पुणे | शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे पुण्यात आज निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात बाबासाहेब पुरंदरेंवर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. काही दिवसांपुर्वी बाबासाहेब पुरंदरेंना घरात पाय घसरून पडल्याने इजा झाली होती. आज सकाळी 5:07 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनामुळे एक पर्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.  ते 100 वर्षांचे होते. साडे आठ वाजता पार्थिव पर्वती इथल्या निवासस्थानी ठेवण्यात येईल आणि सकाळी साडे दहा वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

प्रचंड व्यासंग, उत्साहाचा धबधबा असल्याने भव्यदिव्य अन् हिमालयाहून अधिक उंचीचे एकाहून एक सरस असे उपक्रम अखेरच्या महिन्यापर्यंत करणारी प्रेरणाज्योत विझल्याने सह्यगिरीतील गडेकोट अन दऱ्याखोऱ्या मुक्या झाल्या. अखेरपर्यंत म्हणजे कोरोनाची महासाथ सुरू होईपर्यंत व्याख्यानांच्या आणि अन्य कामांच्या निमित्ताने देशा-परदेशात अखंड भ्रमंती सुरू असलेल्या बाबासाहेबांनी नुकतेच शंभराव्या वर्षांत पदार्पण केले होते.

त्यानिमित्ताने त्यांच्या झालेल्या अनेक मुलाखतींमधून त्यांनी उत्साहाने दीड-दीड तास आपले मनोगत व्यक्त केले होते. तसेच दसऱ्याला भारत इतिहास संशोधक मंडळाच्या कार्यक्रमासही ते प्रमुख पाहुणे होते. मात्र 26 ऑक्टोबरला सकाळी ते उठले असता त्यांचा तोल गेला आणि त्यांच्या डोक्याला इजा झाली. त्यानंतर त्यांना तातडीने एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले.

तेथेही पहिले दोन दिवस ते व्यवस्थित बोलत होते. त्यानंतर मात्र त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना न्यूमोनिया झाला आणि त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. नंतर त्यांची प्रकृती खालावत गेली आणि आज त्यांचे निधन झाले. पुरंदरे यांच्या पत्नी निर्मलाताई यांचे काही वर्षांपूर्वी निधन झालं आहे. चिरंजीव अमृत आणि प्रसाद तसेच कन्या माधुरी असा परिवार आहे. त्यांच्या सर्वच परिवाराने वेगवेगळ्या क्षेत्रांत नावलौकिक कमावला आहे.

माधुरी या ज्येष्ठ बालसाहित्यिक आणि गायिका आहेत. ज्येष्ठ चिरंजीव अमृत हे पुरंदरे प्रकाशनची जबाबदारी समर्थपणे सांभाळतात तर, लहान चिरंजीव प्रसाद यांनी नाट्य तसेच दुचाकींच्या क्रीडा प्रकारात काम केले आहे. समाजप्रिय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा संपर्क अनेक क्षेत्रांशी असल्याने केवळ पुण्यातीलच नव्हे तर देशातील त्यांच्या हजारो जणांना धक्का बसला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com