TET Scam : सत्तारांच्या लेकींवर कारवाईचा बडगा; कृषिमंत्री अडचणीत

TET Scam : सत्तारांच्या लेकींवर कारवाईचा बडगा; कृषिमंत्री अडचणीत

शिक्षण संचालकांकडून बोगस शिक्षकांची यादी जाहीर; अब्दुल सत्तार यांच्या मुलींची नाव सामील

पुणे : टीईटी परीक्षा पेपरफुटी प्रकरण चांगलंच गाजलं आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेकडून या 7800 बोगस शिक्षकांची नावे जाहीर करण्यात आली होती. यातील शिक्षक म्हणून नोकरी करणाऱ्या या शिक्षकांना सेवेतून बडतर्फ करण्याच्या सूचना शिक्षण संचालकांने दिल्या होत्या. यानुसार आज कारवाई करण्यात येणाऱ्या बोगस शिक्षकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे यामध्ये कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलींच्या नावाचा समावेश आहे.

पुणे पोलिसांनी पर्दाफाश केलेल्या 2019 च्या टीईटी परीक्षेत ७ हजार ८०० विद्यार्थी बेकायदेशीरपणे पास झाल्याचे उघड झाले होते. यामध्ये अब्दुल सत्तार यांच्या दोन्हीही मुलींच्या नावांचा समावेश असल्याचे मध्यतंरी उघड झाले होते. हिना कौसर अब्दुल सत्तार शेख आणि उझमा नाहीद अब्दुल सत्तार शेख अशी या मुलींची नावे आहेत. परंतु, अब्दुल सत्तार यांनी हे चुकीचे असल्याचे स्पष्टीकरण दिले होते. माझ्या मुलींनी 2020 मध्ये परीक्षा दिल्याचे सांगत सत्तारांनी चर्चांना पूर्णविराम लावला होता. परंतु, आता पुन्हा एकदा अब्दुल सत्तार यांच्या मुलींची नावे चर्चेत आली आहेत.

शिक्षण संचालकांकडून सरकारी अथवा खासगी शाळेत शिक्षक म्हणून नियुक्त असलेल्या बोगस शिक्षकांची नावे जाहीर करण्यात आली असून वेतन स्थगितीचा आदेश देण्यात आला आहे. या यादीत पुन्हा एकदा अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची नावे आली आहेत. या दोन्हीही मुली सत्तारांच्या औरंगाबाद जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थेत कार्यरत आहेत. यामुळे सत्तार आता काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

दरम्यान, काहीच दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेकडून या 7800 बोगस शिक्षकांची नावे जाहीर करण्यात आली होती. या 7800 विद्यार्थ्यांना अपात्र ठरविण्यात येणार असून त्यांचे प्रमाणपत्र रद्द करण्यात येणार आहे. त्याचबरोबर त्यांना इथून पुढे शिक्षक पात्रता परीक्षा देण्यास मनाई करण्यात येणार आहे. बोगस पद्धतीने पात्र झालेल्या या 7800 विद्यार्थ्यांपैकी शिक्षक म्हणून नोकरी करणाऱ्यांचा शोध घेण्यात आला आहे. शिक्षक म्हणून नोकरी करणाऱ्या या शिक्षकांना सेवेतून बडतर्फ करण्याच्या सूचना शिक्षण संचालकांकडून देण्यात आल्या आहेत. या याद्या आज जाहीर करण्यात आल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com