पंढरपुरातील श्री विठ्ठल मूर्तीच्या चरणाचा वज्रलेप निघू लागला? विश्व वारकरी सेनेने दिला इशारा
अमोल नांदूरकर|अकोला : महाराष्ट्राचे आराध्य दैवत व दक्षिण काशी असणारे 'श्री क्षेत्र पंढरपूर' येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरामध्ये विठ्ठलाच्या व रुक्मिणी मातेच्या मूर्तीची झीज होऊ नये म्हणून गेल्या एक वर्षापूर्वी मूर्तीला वज्रलेप करण्यात आला होता. पुरातत्त्व विभागाच्या सल्ल्यानुसार आणि त्यांच्या सर्व देखरेखी खाली हा वज्रलेप करण्यात आला होता. पण एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच मंदिरातील रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या पायाचा वज्रलेप निघाला होता. दोन महिन्यापूर्वी रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या चरणावर वज्रलेप लावण्यात आला. पण, आता पांडुरंगाच्या मूर्तीच्या चरणाची झीज होतेय. डाव्या चरणाचे वज्रलेप निघत असल्याचा दावा करण्यात आला आहे.आज मूर्तीवर त्वरित वज्रलेप लावण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने या सर्व गोष्टीकडे रीतसर लक्ष देऊन व पुरातत्त्व विभागाच्या निदर्शनास या गोष्टी आणून देऊन ही होणारी झीज त्वरित थांबवावी व श्री क्षेत्र पंढरपूर येथे येणाऱ्या सर्व भाविकांच्या भावनांशी होणारा खेळ थांबवावा, या आशयाचे निवेदन विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवार यांना देण्यात आले आहे.
सोबतच श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील श्री पांडुरंगाच्या मूर्तीचा फोटो काढण्याची परवानगी आम्हाला मिळावी, अशी मागणी यावेळी हभप गणेश महाराज शेटे यांनी केली आहे. पण फोटो काढण्यास परवानगी देण्यात आली नाही. एवढा खर्च करून लावलेला वज्रलेप सहजासहजी निघत असेल तर हा भाविकांच्या भावनेशी सुरू असलेला खेळच म्हणावा लागेल म्हणून निवेदनाद्वारे समितीस विनंती करण्यात आलीय. मूर्तीवर त्वरित वज्रलेप लावण्यात यावा, अशी मागणी हभप गणेश महाराज शेटे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
आपल्या मागणीचा विचार न झाल्यास नवरात्र उत्सवामध्ये (घटस्थापनेच्या दुसऱ्या दिवशीच) विश्व वारकरी सेनेच्या संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व वारकरी बांधवांना आणि सर्व भाविकांना सोबत घेऊन नामदेव पायरीजवळ उपोषण करणार असल्याचा इशारा विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष हभप. गणेश महाराज शेटे यांच्यासह संघटनेतील सदस्यांनी दिला आहे.पंढरपूर येथील मंदिर समितीने व प्रशासनाने विठ्ठल मूर्तीची झीज लवकरात लवकर न थांबविल्यास पुढील काळात विठ्ठल मंदिराच्या सर्व प्रशासनाला घेराव घालून मोठ्या प्रमाणात आंदोलन करून आणि उपोषणाच्या मार्गाने आम्ही आमचा न्याय मागणार आहोत, असा इशाराही गणेश महाराज शेटे यांनी दिला आहे.