ठाकरे गटाला मोठा दिलासा! ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करा; हायकोर्टाचा आदेश

ठाकरे गटाला मोठा दिलासा! ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करा; हायकोर्टाचा आदेश

ठाकरे गटाकडून उमेदवारी असलेल्या ऋतुजा लटके यांनी राजीनाम्यासाठी आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी आज सुनावणी झाली असून ऋतुजा लटके यांचा उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला आहे.

मुंबई : ठाकरे गटाकडून उमेदवारी असलेल्या ऋतुजा लटके यांनी राजीनाम्यासाठी आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी आज सुनावणी झाली असून ऋतुजा लटके यांचा उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला आहे. पालिकेकडून लटकेंचा राजीनामा मंजूर करण्याचे आदेश न्यायालयाने मुंबई पालिकेला दिले आहे. उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत मंजूर करण्याचे आदेश न्यायालायने दिले आहेत. यामुळे ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.

ऋतुजा लटके यांच्या याचिकेवर सुनावणीदरम्यान न्यायालयाने पालिकेला खडसावले. नियमातून तुम्ही याआधी अनेकांना मुभा दिली आहे. मग ऋतुजा लटके यांच्या बाबतीत भेदभाव का केला जात आहे? अशी विचारणा न्यायालयाने पालिकेला केली. नोटीस कालावधी माफ करण्याचा पालिकेला विशेषाधिकार असताना राजीनामा का स्वीकारला जात नाही? अशी प्रकरणं न्यायालयात येता काम नयेत, असेही न्यायालयाने पालिकेला ठणकावले आहे. न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे सुनावणी झाली.

तत्पुर्वी, लटकेंच्या वकील विश्वजित सावंत आणि पालिकेच्या वकीलाकडून जोरदार युक्तीवाद करण्यात आला. सष्टेंबरमध्येच पालिकेला राजीनामा सादर केला असल्याचे लटकेंच्या वकीलाकडून सांगण्यात आले. या राजीनामा पत्रात सुरुवातीला ऋतुजा लटके यांनी काही अटी घातल्या होत्या. परंतु, ऑक्टोबरमध्ये पुन्हा एकदा राजीनामा पालिकेला दिल्याचे त्यांनी सांगितले. या पत्रात कोणत्याही अटी नव्हत्या. याशिवाय पालिका नियमांप्रमाणे ऋतुजा लटके यांनी एक महिन्याचा पगार 67 हजार रुपये पालिकेत भरले होते. तरीही केवळ राजकीय दबावापोटीच राजीनामा थांबवण्यात आल्याचा आरोप यावेळी ऋतुजा लटके यांच्या वतीने करण्यात आला.

तर, 12 ऑक्टोबर रोजी ऋतुजा लटके यांच्याविरोधात भ्रष्टाचार आणि लायझनिंगची तक्रार असल्याचे पालिकेच्या वकीलांनी म्हंटले आहे. तर, राजीनामा दिल्यानंतर लटके या पालिकेत येतच नव्हत्या, असा दावाही त्यांनी केला आहे. परंतु, ही पालिकेची खेळी असल्याचा आरोप वकील विश्वजित सावंत यांनी केला आहे. तसेच, भ्रष्टाचाराची चौकशी होत राहील. तुम्ही राजीनामा मंजूर करा, अशी मागणीही लटकेंच्या वकीलांनी केली आहे. यावर तुम्ही उमेदवारी अर्ज भरा. आमची काहीच हरकत नसल्याचे पालिकेच्या वकीलांनी म्हंटले आहे.

दरम्यान, अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी ऋतुजा लटके यांना ठाकरे गटाने उमेदवारी दिली आहे. तर, भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्याची शक्यता होती. परंतु, अद्याप जाहीर करण्यात आले नाही. तसेच, आज संध्याकाळी भाजप-शिंदे गटाची महत्वपूर्ण बैठक होणार असून पोटनिवडणुकीसाठी युतीचा उमेदवार देणार असल्याचे सांगितले जात आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com