...तर एखाद्या मुख्यमंत्र्यांने उद्योग मंत्र्याचा राजीनामा घेतला असता : आदित्य ठाकरे

...तर एखाद्या मुख्यमंत्र्यांने उद्योग मंत्र्याचा राजीनामा घेतला असता : आदित्य ठाकरे

महाराष्ट्रातून बल्क ड्रग पार्कही गुजरातला गेला असल्याचा आदित्य ठाकरेंचा खुलासा

मुंबई : वेदांता-फॉक्सकॉन कंपनीवरुन आता राजकारण तापत असतानाच बल्क ड्रग पार्कदेखील महाराष्ट्रादेखील गुजरातला गेले आहे, असा खुलासा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. हे उद्योग मंत्र्यांना माहिती आहे का? एखाद्या मुख्यमंत्र्यांने उद्योग मंत्र्याचा राजीनामा घेतला असता, असेदेखील त्यांनी पत्रकार परिषदेत म्हंटले आहे.

वेदांता-फॉक्सकॉनचा पावणे दोन लाख कोटींचा प्रकल्प गुजरातला गेल्याचा धक्का महाराष्ट्राला बसलेला असताना आता आणखी एक मोठा धक्का महाराष्ट्राला बसला आहे. महाराष्ट्रात रायगडमध्ये होणारा तीन हजार कोटींचा बल्क ड्रग पार्क प्रकल्प गुजरातला होणार आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रात ५० हजारापेक्षा अधिक रोजगार उपलब्ध होणार होता. मात्र खोके सरकरमुळे दोन मोठे प्रकल्प महाराष्ट्रातून परराज्यात जात आहेत, असं शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे म्हणाले. महाराष्ट्राला हवे असणारे प्रकल्प पळवताहेत आणि नको असलेले प्रकल्प स्थानिकांवर थोपवताहेत, अशी सडकून टीका आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर केली.

बल्क ड्रगमध्ये सरकार पावणेतीन हजार कोटी गुंतवणूक करणार होती. नव्या घटनाबाह्य बेकायदेशीर सरकारने ४० आमदारही तिकडं नेले आणि दोन मोठे प्रकल्पही तिकडं नेले.  केंद्राबरोबर नीट सांगड घातल्यास सर्व शक्य आहे. पण यांचे कारभारात लक्ष नाही. बल्क ड्रगमुळे ८० हजार रोजगार निघून गेले आहेत. अजून तरूण शांत आहेत पण त्यांचा अंत पाहू नका. बल्क ड्रग पार्कही आपल्याकडून कसा काय गेला? एकही गुंतवणूक केंद्राच्या परवानगीशिवाय येऊ शकत नाही. मग केंद्राला पाठपुरावा करून आम्ही आणले मग यांना का जमत नाही? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.

महाराष्ट्रातून बल्क ड्रग पार्क गुजरातला गेलाय हे उद्योग मंत्र्यांना माहिती आहे का? असा सवाल करत ८० हजार आणि ते वेदांता प्रकल्पातून निर्माण होणारे दीड लाख रोजगार गेले त्याला जबाबदार कोण? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.

वेदांत प्रकल्प गुजरातमध्ये कसा गेला?

चाळीस गद्दारांनी सरकार पाडलं, त्यामुळे फॉक्सकॉन प्रकल्प रखडला. एक लाख रोजगार राज्याच्या बाहेर गेले, याची जबाबदारी कोण घेणार आहे. वेदांत प्रकल्प गुजरातमध्ये कसा गेला, याचं उत्तर अद्यापही मिळालं नाही. जेव्हा फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये जात होता, तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणपती दर्शनात व्यस्त होते. आता नवरात्र येणार आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी गरबा, दांडियासाठी न फिरता थोडेसे लक्ष द्यावे, असा सल्ला आदित्य ठाकरे यांनी दिला.

Lokshahi
www.lokshahi.com