आठवड्याभरात टोल नाके बंद करा; आदित्य ठाकरेंचा टोलविरोधात एल्गार
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यांमुळे राज्यातील प्रश्न वाऱ्यावर आहेत, अशी टीका ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केली आहे. मुंबईतील टोल नाक्यावरुन आदित्य ठाकरे आज शिंदे-फडणवीस-पवार सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. टोलचा पैसा एमएसआरडीसीकडे का? असा सवाल आदित्य ठाकरेंनी बीएमसीला केला आहे. तसेच, मुंबईतले टोल बंद करा, अशी मागणीही आदित्य ठाकरे यांनी केली आहे
आदित्य ठाकरे म्हणाले की, आता सर्व रस्त्यांची डागडुजी हे मनपाकडून होत आहे. मग, माझा प्रश्न असा आहे की टोल नाका आणि इतर जाहिरातींच्या होर्डिंगचे पैसेही मनपाला का दिले जात नाही? हे सगळे पैसे एमएसआरडीसीकडे जात आहे. सर्वात जास्त कर मुंबईकर देत असतात. घटनाबाह्य मुख्यमंत्री का लक्ष देत नाही, असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला आहे.
एमएसआरडीसीचे मुंबईच्या रस्त्यांवर काही काडीमात्र काम नाही. मग, होर्डिंगचे पैसे आणि टोलचे पैसे हे महानगर पालिकाला यावे. हे सर्व पैसे राज्य सरकार आणि एमएसआरडीसीला जात आहे. पण, जर मनपा सगळ करत आहे तर टोल नाका रद्द व्हावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. आमचं सरकार आलं की टोल बंद होणार, असेही आदित्य ठाकरेंनी म्हंटले आहे.
तसेच, आदित्य ठाकरे यांनी मुंबई-गोवा हायवे आणि मुंबई नाशिक नॅशनल हायवेचा मुद्दा उपस्थित केला आहे. नॅशनल हायवे अथॉरिटी दोन्ही हायवे सुव्यवस्थित ठेवण्यात यंत्रणेला अपयश आल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली. नाशिक हायवेवर चंद्रावर जसे खड्डे दिसतात तसे खड्डे पडल्याचा टोलाही त्यांनी लगावला. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचं हे अपयश असल्याची टीकाही त्यांनी केली.
दरम्यान, राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयामुळे दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने निकाल दिला म्हणून त्यांना खासदारकी परत द्यावी लागली. नाही तर हे हुकूमशाहीचे सरकार आहे, अशी निशाणाही त्यांनी मोदी सरकारवर साधला आहे. तर, किशोरी पेडणेकरसंदर्भात आदित्य ठाकरे म्हणाले, जे सत्यासोबत उभे आहेत त्यांना सत्तेसोबत उभे असणाऱ्यांकडून सतविले जात आहे.