शिंदेंच्या मेळाव्यावर अजित पवारांचा निशाणा; लोक आपणहून आली होती तर सभा अर्धवट सोडून का गेली

शिंदेंच्या मेळाव्यावर अजित पवारांचा निशाणा; लोक आपणहून आली होती तर सभा अर्धवट सोडून का गेली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी टीकास्त्र सोडले.

कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी टीकास्त्र सोडले. लोक आपणहून आली होती तर सभा अर्धवट सोडून का गेली, असा सवाल त्यांनी शिंदे सरकारला विचारला आहे. कोल्हापूरातील आसुर्ले-पोर्ले येथे सभा आज राष्ट्रवादीची सभा झाली. यावेळी ते बोलत होते.

अजित पवार म्हणाले की, हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची परंपरा आहे. शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यासाठी आणि शिवाजी पार्कसाठी तुम्ही न्यायालयात जाता. तुमचे विचार तुम्ही ऐकावावे, ते त्यांचे विचार ऐकवतील. लोकशाहीध्ये आम्ही दुसऱ्याचे ऐकूनच घेणारच नाही ही भूमिका चुकीची आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना दिली तिचे पालन प्रत्येकाने केले पाहिजे, असे म्हणत त्यांनी शिंदेंना टोला लगावला. सत्ता गेली म्हणून आम्ही टीका करत नाही. सत्ता येते-जाते. सत्तेसाठी आम्ही हाफाफलेले नाही. लोकांनी जी जबाबदारी दिली ती व्यवस्थितपणे पार पाडू, असेही त्यांनी म्हंटले आहे.

दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातील लोकांसाठी शिंदे गटाने बसेस बुक केल्या होत्या. यासाठी शिंदे गटाने एसटीकडे 10 कोटी भरले होते, असे वृत्त होते. या मुद्दयावरुनही अजित पवार यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. फक्त लोकांना आणण्यासाठी तुम्ही एसटीला 10 कोटी भरता हे पैसे येतात कुठून, असा सवालच त्यांनी विचारला आहे.

तसेच, मुख्यमंत्र्यांनी एवढी लोक आपणहून लोकं आली आहेत, असे भाषणात म्हंटले होते. यावर बोलताना अजित पवार म्हणाले, आपणहून आलेली लोकं हे तुम्ही अनेकदा का सांगत होता. मग ती लोक सभा अर्धवट सोडून उठून का गेली, असा सवालही त्यांनी यावेळी केला. ते उठून गेले नसते तर मुख्यमंत्र्यांनी आणखी किती वेळ भाषण केले असते. शिंदे साहेबांच्या भाषणाला प्रतिसाद मिळत नव्हता. पण, उध्दव ठाकरेंच्या भाषणाला प्रतिसाद मिळत होता, असेही त्यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com