फडणवीसांना अडकवणाऱ्याचे नाव सांगेन; शेलारांच्या विधानाला अजित पवारांचे प्रत्युत्तर, म्हणाले...
जालना : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अडकवण्याचा प्रयत्न नेमकं कोण करत होतं, ते मी नावासहित उघड करेन, असा इशारा भाजप नेते आशिष शेलार यांनी दिला होता. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. बोलताना स्पष्ट बोलावे, कोड्यात बोलू नये, असा टोला अजित पवारांनी शेलारांना लगावला आहे. त्यांनी आज जालन्यात माध्यमांशी संवाद साधला.
काय म्हणाले अजित पवार?
कोण काय म्हणाले आहेत, त्यांना उत्तर द्यायला आम्ही मोकळे नाही. प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे. मी अडीच वर्ष उपमुख्यमंत्री असताना मी जे काही निर्णय घेतले त्यात देवेंद्र फडणवीस यांना अडकवण्याचा संदर्भात कुठल्याही प्रकारचा निर्णय किंवा चर्चा झालेली नाही, असे अजित पवार यांनी म्हंटले आहे.
तसेच, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा तो शपथविधी ही शरद पवारांची खेळी असू शकते, या जयंत पाटील यांच्या दाव्यावर अजित पवारांनी बोलण्यास नकार दिला. पहाटेच्या शपथविधीचा विषय मी कदापीही काढणार नाही, अशा शब्दात त्यांनी बोलणे टाळले.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तशी सुपारीच तत्कालीन पोलीस आयुक्त संजय पांडे यांना देण्यात आली होती, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.