अमित ठाकरे यांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र; काय आहे पत्रात?

अमित ठाकरे यांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र; काय आहे पत्रात?

अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक शाळा, महाविद्यालय आणि सरकारी कार्यालयात "जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा" हे आपलं 'राज्य गीत' लावण्याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात यावा, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे.

या पत्रात म्हटले आहे की, जे गीत ऐकताच महाराष्ट्रातील मराठी जनतेचा ऊर अभिमानाने भरून येतो, ज्या गाण्याने प्रत्येक मराठी माणसाच्या अंगावर रोमांच उभे राहतात अशा “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा…” ह्या कै. गीतकार राजा बढे लिखित आणि कै. शाहीर कृष्णराव साबळे यांनी गायलेल्या गीताला गेल्या वर्षी दि. १ फेब्रुवारी २०२३ रोजी महाराष्ट्राचे ‘राज्य गीत’ असा दर्जा देण्यात आला. महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक अधिकृत शासकीय कार्यक्रमात ह्या राज्य गीताचे गायन करणे किंवा ध्वनिमुद्रित स्वरूपात ते लावणे अपेक्षित आहे आणि ते गायले जावेच- लावले जावेच हा आमचा आग्रह आहे.

शासकीय परिपत्रकानुसार, राज्यातील प्रत्येक शाळेत आणि महाविद्यालयात अध्ययन वर्ग सुरू होण्यापूर्वी “जन गण मन अधिनायक जय हे…” ह्या आपल्या राष्ट्रगीताचे गायन करणे अनिवार्य आहे. राष्ट्रगीताचा मान राखण्याबाबत शालेय स्तरापासून ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांवर जाणीवपूर्वक संस्कार केले जातात, त्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्राच्या राज्य गीताचे महत्व भावी पिढ्यांना- विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी आणि त्यांना आपल्या अत्यंत प्रेरणादायी राज्य गीताचा उचित सन्मान राखण्याची सवय लावण्यासाठी प्रत्येक शाळा तसंच महाविद्यालयात राज्य गीताचे गायन अनिवार्य करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर शाळा आणि महाविद्यालयांत प्रवेश करताच विद्यार्थी सहज वाचतील अशा ठिकाणी म्हणजे शैक्षणिक संस्थेच्या इमारतीच्या दर्शनी भागात एका मोठ्या फलकावर अथवा भिंतीवर ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा…’ हे संपूर्ण राज्य गीत लिहून त्याला कायमस्वरुपी ठळक प्रसिद्धी देण्याचे आदेश आपण सर्व शैक्षणिक संस्थांना द्यावेत. त्याच प्रमाणे, बांद्यापासून चांद्यापर्यंतच्या प्रत्येक सरकारी कार्यालयाच्या दर्शनी भागातही आपले राज्य गीत लावण्यात यावे.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या या मागण्यांचा आपण गांभीर्याने विचार करावा, ही विनंती. उद्या २७ फेब्रुवारी. ‘मराठी भाषा गौरव दिना’च्या पूर्वसंध्येला आपण याबाबतचा शासकीय आदेश काढला तर सर्वांना निश्चितच आनंद होईल. असे या पत्रात म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com