बच्चू कडूंना सत्तेतून बाहेर काढा; भाजप पदाधिकाऱ्यांची घोषणाबाजी, नेमकं प्रकरण काय?
सूरज दहाट | अमरावती : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मागील काही दिवसांपासून आलबेल नसल्याचे समोर येत आहे. अपक्ष आमदार बच्चू कडू यांना नुकताच राज्य मंत्री पदाचा दर्जा जाहीर केला होता. परंतु, अमरावतीच्या भाजपने बच्चू कडूंविरोधात नाराजी दर्शवली आहे. आमदार बच्चू कडूंना सत्तेतून बाहेर काढा, अशी घोषणाबाजीच भाजप पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यातील चांदूर बाजार नगर पालिकेच्या परिसरात गेल्या ४ दिवसांपासून विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण करत असलेल्या अन्यायग्रस्त कुटुंबांना तात्काळ न्याय मिळावा यासाठी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी नगरपालिकेवर धडक दिली. तर भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून बच्चू कडू यांना सत्तेतून बाहेर काढण्याची घोषणाबजी करण्यात आली.
या कुटूंबांची कोणतीही पर्यायी व्यवस्था न करता पोलीस बंदोबस्तात नगर पालिकेने बच्चू कडू यांच्या दबावात येऊन हिटलरशाही पद्धतीने अन्यायग्रस्त कुटुंबांच्या घरावर गजराज चालवला आणि त्यांना बेघर केल्याचा आरोप भाजपाने केला आहे. तर, बच्चू कडू यांना आपल्या मतदारसंघातच भाजप पदाधिकारी विरोध करत असल्याने खळबळ उडाली आहे.
दरम्यान, अमरावती लोकसभा निवडणुकीच्या जागेवर आमदार बच्चू कडू यांनी दावा केला होता. तर, अमरावती जागेवर नवनीत राणा सध्या खासदार असून त्यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. यामुळे जागा वाटपावरून महायुतीत आता वाद होण्याची शक्यता आहे. राज्यात विधानसभेच्या 15 जागा लढवणार असल्याची माहिती कडू यांनी दिली होती.