Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Team Lokshahi

सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाच्या निर्णयावर स्थगितीस नकार; ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायलयात सुनावणी झाली.

मुंबई : निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायलयात सुनावणी झाली. न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या निर्णयावर स्थगिती देण्यास नकार दिला आहे. परंतु, याचिकेवर दोन आठवड्यांनी सुनावणी घेणार असून तोपर्यंत शिंदे गटाने कोणताही व्हिप ठाकरे गटाच्या सदस्यांना बजावू नये, असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. यावर ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Uddhav Thackeray
सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाच्या निर्णयावर स्थगितीस नकार; ठाकरे गटाला झटका

सर्वोच्च न्यायालयात आमची मागणी त्यांनी विचारात घेतली याचे समाधान आहे. आमची याचिका फेटाळून लावलेली नाही. संविधानाला टाळून जर निवडणूक आयोग निर्णय घेणार असेल तर देशाच्या लोकशाहीसाठी हे घातक आहे. परंतु, आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीतून न्याय मिळाला असं वाटतं, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

निवडणूक आयोगाचे सर्व प्रमुख विकले गेलेले आहेत. आयोगाने बाजार मांडला आहे. तुम्ही आमच्याबाजूने निकाल द्या, आम्ही तुम्हाला राज्यपाल करतो. निवडणूक आयोगाचा निर्णय लोकशाहीच्या मुळावर आलेला आहे. त्यांच्या कुठल्याही निर्णयाला ते स्पष्टीकरण देऊ शकत नाहीत, अशी जोरदार टीकाही सावंतांनी केली आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या निर्णयावर स्थगिती देण्यास नकार दिला आहे. परंतु, ठाकरे गटाला दोन आठवड्याचे संरक्षण दिले असून सुनावणी सुरू असेपर्यंत मशाल चिन्ह ठाकरे गटाकडे राहणार असल्याचे न्यायालयाने सांगितले आहे. यामुळे ठाकरे गटाला काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे. तर, अर्थसंकल्पीय अधिवेशानात व्हिप जारी करणार नाही, अशी ग्वाहीही शिंदे गटाने दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com