Uddhav Thackeray
Uddhav ThackerayTeam Lokshahi

'उद्धव ठाकरे अहंकाराने ओतप्रोत' भाजप नेत्याची उध्दव ठाकरेंवर टीका

देवेंद्र फडणवीस यांची माफी मागून फडतूस या शब्दावरून सुरू असलेल्या वादावर उद्धव ठाकरे यांनी पडदा टाकावा. चंद्रकांत पाटलांचा उध्दव ठाकरेंना सल्ला.
Published by :
Sagar Pradhan

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरू आहे. त्यातच दुसरीकडे भाजप आणि शिवसेना ठाकरे गटात चांगलाच शाब्दिक वाद रंगला आहे. ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘फडतूस गृहमंत्री’ म्हटले होते. त्यानंतर फडणवीसांनी ‘मी फडतूस नव्हे काडतूस आहे’ असं लगेच उत्तर दिले आहे. मात्र या शब्दावरून वाद सुरु असताना त्यातच उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची माफी मागून वादावर पडदा टाकावा असा सल्ला मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी सल्ला दिल्यानंतर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी उध्दव ठाकरेंवर टीका केली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी उध्दव ठाकरेंना सल्ला दिल्यानंतर यावरुन प्रवीण दरेकर म्हणाले की, “माफी मागून वादावर पडदा टाकतील ते उद्धव ठाकरे कसले”, असा टोला उध्दव ठाकरेंनी लगावला आहे. देवेंद्र फडणवीस हे खूप संयमी नेते आहेत. शिवसेना भाजपाच्या सत्ताकाळात अनेकदा उद्धव ठाकरेंना त्यांनी समजून घेतलं. अगदी भावासारखं प्रेम आणि सहकार्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे हे आम्हाला माहिती आहे, संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. असे दरेकर म्हणाले. उद्धव ठाकरे हे अहंकाराने ओतप्रोत असे नेते आहेत. अहंकार आणि इगोमुळे त्यांच्या पक्षाची वाट लागली. पक्ष लयाला गेला, ते पक्षाचं चिन्हदेखील घालवून बसले. अहंकारापुढे सर्व गोष्टी त्यांच्यासमोर शून्य होतात. अशी देखील टीका त्यांनी यावेळी उध्दव ठाकरेंवर केली.

काय दिला होता चंद्रकांत पाटील यांनी ठाकरेंना सल्ला?

देवेंद्र फडणवीस यांची माफी मागून फडतूस या शब्दावरून सुरू असलेल्या वादावर उद्धव ठाकरे यांनी पडदा टाकावा. तसेच देवेंद्र फडणवीस हे मोठ्या मनाचे आहेत. ते माफ करतील. असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com