राजकारणात कधी कधी कॉम्प्रोमाईज करावे लागते, सावेंचे विधान
आज औरंगाबाद शहरात `फ्रेंड्स ऑफ बीजेपी` या अभियानातून संवाद भाजपच्या मित्रांसोबत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची देखील उपस्थिती होती. या कार्यक्रमात उद्योजक, व्यापारी, वकील, डाॅक्टर व इतर नागरिक सहभागी झाले होते. याच कार्यक्रमात मंत्री अतुल सावे यांनी खळबळजनक विधान केले आहे.
यावर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार चांगले काम करत आहे, राजकारणात कधी कधी कॉम्प्रोमाईज करावे लागते, असे सांगत सहकार मंत्री अतुल सावे यांनी वेळ मारून नेली. भाजपने राज्यात `फ्रेंड्स ऑफ बीजेपी` हे अभियान सुरू केले आहे. या अंतर्गत मराठवाडा तसेच संपूर्ण राज्यभरात 'सोशल मीडिया वारीअर्स' नियुक्त करण्यात येणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून फ्रेंड्स ऑफ बीजेपी या अभियानाची सुरवात करण्यात आली आहे.
डॉकटर,वकील,साहित्यिक अशा वर्गाला भाजपबद्दल आत्मीयता आहे पण तो पक्षाच्या दैनंदिन कार्यक्रमात सहभागी होऊ शकत नाही, अशा नागरिकांना `फ्रेंड्स ऑफ बीजेपी` या अभियानातून पक्षाशी जोडण्यात येणार आहे. याच चर्चेत सहभागी झालेल्या उपस्थित नागरिकांनी फडणवीस यांना पक्षात दुय्यम स्थान दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. याबाबत सवाल केल्यानंतर त्यावर बोलताना सहकार मंत्री अतुल सावे म्हणाले की, सध्या राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार हे चागंले काम करत आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली विकासकामांना गती मिळत आहे. राजकारणात कधी कधी कॉम्प्रोमाईज करावे लागते, असे म्हणत त्यांनी उद्योजकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.