मोदींची जादू कायम; राहुल गांधींची भारत जोडो फेल

मोदींची जादू कायम; राहुल गांधींची भारत जोडो फेल

चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. सुरुवातीच्या कलांनुसार भाजपने मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड राज्यात आघाडी घेतली आहे.

Assembly Election Result 2023 : चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. सुरुवातीच्या कलांनुसार भाजपने मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड राज्यात आघाडी घेतली आहे. तर, तेलंगणा राज्यात कॉंग्रेस आघाडीवर आहे. लोकसभेची सेमीफायनल म्हणून पाहिल्या जाणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपने कॉंग्रेसचा धुव्वा उडवला आहे. या तिन्ही राज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी जोरदार प्रचार केला होता.

राजस्थानमध्ये काँग्रेसची सत्ता आहे, पण तिथे भाजपने बहुमतापेक्षा जास्त जागा घेऊन आघाडी घेतली आहे. त्यामुळे सत्ताधारी काँग्रेसला धक्का बसला आहे. कॉंग्रेसमधील अंतर्गत अशोक गेहलोत विरुद्ध सचिन पायलट यांच्या वादाचा फटकाही निवडणुकीत जाणवला आहे.

तर, छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. पण मतमोजणीमध्ये सकाळपासून आघाडीवर असलेल्या काँग्रेसला भाजपने मागे टाकत बहुमताचा आकडा गाठला आहे. छत्तीसगडमध्येही टी. एस. सिंग देव आणि भूपेश बघेल यांच्यात वादाचा निवडणुकीवर परिणाम झाल्याचे दिसून येते. त्यामुळे भाजपने काँग्रेसच्या हातातून 2 राज्य हिसकावून घेणार असं चित्र आहे.

मध्य प्रदेशमध्ये अमित शहा यांनी जातीने लक्ष घातलं होतं. मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंह चौहान यांच्या ‘लाडली बहना’ योजना गेमचेंजर ठरली आहे. तसेच, शिवराज सिंह यांची लोकप्रियता फायदेशीर ठरली आहे. मध्य प्रदेशमध्ये निवडणुकीत ज्योतिरादित्य शिंदे यांनी महत्वाची भूमिका बजावली. यामुळे भाजपने मध्य प्रदेशमध्ये मोठी आघाडी घेतली आहे. तर, कमलनाथ आणि दिग्विजय सिंह यांच्यातला वादाचा कॉंग्रेसला फटका बसल्याचे दिसून येते.

याशिवाय 'भारत जोडो'चा प्रभाव राहिला नाही. सॉफ्ट हिंदुत्व मतदारांना रुचलं नाही. बंडखोरांमुळं काँग्रेसला मोठी किंमत मोजावी लागली, अशीही कारणे कॉंग्रेसच्या पराभवाला कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com