गोळीबार झाला, सरवणकरांनी केला नाही; पोलिसांची क्लीनचिट
मुंबई : दादरमधील गोळीबारप्रकरणी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांना पोलिसांनी आज क्लीनचिट दिली आहे. दादर पोलीस स्थानकाबाहेर गोळी चालवण्यात आली होती ती सदा सरवणकरांच्या बंदुकीतूनच सुटली नसल्याचा अहवाल पोलिसांनी दिला आहे. यामुळे गोळी कोणी मारली, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
प्रभादेवी येथील गणेशोत्सवादरम्यान सदा सरवणकर यांनी गोळीबार केला नसल्याचा पोलिसांनी अहवाल दिला आहे. बंदुक सदा सरवणकर यांचीच होती. मात्र, गोळी अन्य व्यक्तीकडून चालवली गेल्याचाही अहवालात उल्लेख करण्यात आला आहे. सीसीटीव्ही तपासून १४ साक्षीदारांचे जबाब नोंदवल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणाचा बॅलेस्टिक अहवालात सरवणकरांच्या बंदुकीतूनच गोळीबार झाल्याचा देण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी आता आमदार सदा सरवणकर यांना क्लीनचिट दिलेली आहे. पोलिसांचा अहवाल विधानसभेतही पाठविण्यात आला आहे.
काय होते प्रकरण?
गणेश विसर्जनच्या दिवशी प्रभादेवी परिसरात ठाकरे गटाकडून गणेश भक्तांचे स्वागत करण्यासाठी मंच उभारण्यात आला होता. मात्र, या मंचाच्या शेजारी शिंदे गटाने देखील आपला मंच उभारला होता. या मंचावरून शिंदे गटाच्या लोकांनी शिवसेनेच्या नेत्यांवर अपशब्द वापरले. त्यामुळे दोन्ही गटात शाब्दिक बाचाबाचीदेखील झाली. या वादाचे रुपांतर मध्यरात्री राड्यात झाले. सरवणकर समर्थक आणि शिवसैनिक यांच्यात मारामारी झाली होती. पोलीस ठाण्यात आले असता सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसैनिकांकडून करण्यात आला होता.