Eknath Shinde | Uddhav Thackeray
Eknath Shinde | Uddhav Thackeray Team Lokshahi

'खोके आणि गद्दार, याव्यतिरिक्त दुसरा शब्द नाही' मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवर घणाघात

तुम्ही बाळासाहेबांना चुकीचं ठरवलंत? बाळासाहेबांच्या भूमिकेला चुकीचं ठरवलंत. कशासाठी? सत्तेसाठी? यापेक्षा या महाराष्ट्राचं दुर्दैवं काय असू शकतं?

दोन आठवड्यांपूर्वी ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांची खेडमध्ये जाहीर सभा झाली. या सभेत उद्धव ठाकरेंनी शिवसेना शिंदे गटावर जोरदार टीका केली होती. आता त्याच सभेला उत्तर देण्यासाठी शिंदे गटाने त्याच ठिकाणी आज जाहीर सभा आयोजित केली आहे. या सभेच्या अनुषंगाने दोन्ही गटांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाल्याचं पाहायला मिळालं आहे. याच सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागले.

Eknath Shinde | Uddhav Thackeray
मुख्यमंत्र्यांची चौफेर टीका; वाचा संपुर्ण भाषण जशास तसे

नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?

काही लोक ही सभा पाहात असतील. पण पूर्वी झालेली सभा, त्यावेळची गर्दी ही तुलना करायला आम्ही आलेलो नाही. गेल्या आठवड्यात याच महिन्यात एक फुसका बार, आपटी बार येऊन गेला. उत्तर आरोप किंवा टीकेला द्यायचं असतं. पण तोच तो थयथयाट, आदळआपट याला काय उत्तर देणार? मुंबईतही सहा महिन्यांपासून अशीच आदळआपट चालू आहे. तोच खेळ चालू आहे, फक्त जागा बदलली होती. महाराष्ट्रात सर्कशीप्रमाणे त्यांचे जागोजागी शो होणार आहेत. पण तेच टोमणे असतील. खोके आणि गद्दार, याव्यतिरिक्त त्यांच्याकडे दुसरा शब्द नाही. अशी टीका त्यांनी ठाकरेंवर केली.

पुढे ते म्हणाले की, सत्तेसाठी तुम्ही शिवसेना एनसीपी, काँग्रेसकडे गहाण ठेवली. गद्दारी आम्ही नाही केली. गद्दारी 2019ला झाली. हिंदुत्वाचं राजकारण केलं ही चूक झाली असं विधानसभेत उद्धव ठाकरेंनी सांगितलं. म्हणजे तुम्ही बाळासाहेबांना चुकीचं ठरवलंत? बाळासाहेबांच्या भूमिकेला चुकीचं ठरवलंत. कशासाठी? सत्तेसाठी? यापेक्षा या महाराष्ट्राचं दुर्दैवं काय असू शकतं? असे देखील निशाणा त्यांनी यावेळी साधला. तुम्ही खोके, गद्दार म्हणून किती पाप झाकणार? बाळासाहेब ठाकरे तुमचे वडील होते हे किती वेळा सांगणार? हे जगाला मान्य आहे. पण बाळासाहेब तुमचे वडील असले, तरी ते सगळ्या शिवसैनिकांचं दैवत होते. तुम्ही त्यांना वडील म्हणून छोटं करू नका महाराष्ट्रातली जनता तुम्हाला माफ करणार नाही. असेही शिंदे यावेळी म्हणाले.

रामदास कदमांना मी सांगितलं की वर्धापनदिनी षण्मुखानंदला येऊ नका. पण त्यांनी यायचा आग्रह केला. तुम्ही कारस्थान करून मनोहर जोशींना खाली उतरवायला लावलं. तीच गत, तोच डाव रामदास कदम यांच्याबद्दल तुम्ही आखला होता. मी सांगितलं येऊ नका, रामदास कदमांनी माझं ऐकलं. असा कुठला पक्षप्रमुख आपल्याच नेत्यांच्याबद्दल अशी कारस्थानं करू शकतो? आपल्या आमदारांची राजकीय कारकीर्द संपवण्यासाठी दुसऱ्या पक्षांची मदत घेऊन कटकारस्थान करू शकतो? या जगात असा नेता कुठी मी पाहिला नाही. असा देखील घणाघात त्यांनी यावेळी केला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com