पैगंबर मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य; भाजप आमदाराला अटक

पैगंबर मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य; भाजप आमदाराला अटक

भाजप आमदार टी. राजा सिंह यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल केले होते वादग्रस्त वक्तव्य

हैदराबाद : भाजप आमदार टी. राजा सिंह यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावर संतप्त नागरिकांनी मोठ्या संख्येने रस्त्यावरुन उतरुन निदर्शने केली होती. याप्रकरणी पोलिसांनी आज अखेर टी. राजा सिंह यांना अटक केली आहे.

प्रेषित मोहम्मद यांच्यावर कथित वक्तव्य केल्याप्रकरणी टी. राजा सिंह यांच्याविरोधात अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. एवढेच नाही तर डबीरपुरा, भवानीनगर, रेनबाजार, मीर चौक पोलिस ठाण्यांबाहेर मोठ्या संख्येने लोक तक्रारी दाखल करण्यासाठी आले होते.

वास्तविक, टी. राजा यांनी नुकताच एक व्हिडिओ अपलोड केला आहे. यामध्ये त्यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल भाष्य केले होते. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री पोलिस आयुक्त सीव्ही आनंद यांच्या कार्यालयासमोर आणि शहरातील अनेक भागात निदर्शने सुरू झाली. त्याच्या अटकेच्या मागणीवर आंदोलक ठाम होते. या व्हिडिओमध्ये टी. राजा यांनी कॉमेडियन मुनव्वर फारुकी आणि त्याच्या आईवरही टिप्पणी केली आहे.

टी. राजा सिंह हे हैदराबादच्या गोशामहल मतदारसंघाचे आमदार आहेत. यापूर्वी त्याने कॉमेडियन मुनव्वर फारुकी यांनाही धमकी दिली होती. याप्रकरणी त्याला पोलिस कोठडीही घेण्यात आली होती. टी राजा सिंह यांनी मुनव्वर फारुकीचा शो रद्द करण्याबाबत बोलले होते. त्यामुळे यानंतर सुमारे 50 लोक परिसरात पोहोचले होते, मात्र सर्वांना प्रतिबंधात्मक ताब्यात घेण्यात आले.

दरम्यान, टी. राजाआधी नुपूर शर्मानेही एका टीव्ही चॅनलवर प्रेषित मोहम्मदबद्दल भाष्य केले होते. त्यानंतर देशभरातून त्यांच्याविरोधात निदर्शने झाली. त्याच्यावर देशभरात विविध ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. पैगंबर यांच्यावरील वक्तव्यावरून वाढत्या वादानंतर भाजपने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com