कॉंग्रेस शिवसेना-राष्ट्रवादीची साथ सोडणार? अशोक चव्हाण म्हणाले...

कॉंग्रेस शिवसेना-राष्ट्रवादीची साथ सोडणार? अशोक चव्हाण म्हणाले...

बहुमत चाचणीला अशोक चव्हाणांची होती गैरहजेरी

मुंबई : शिंदे सरकारने बहुमताचा आकडा पार करुन 164 मतांनी विजयावर शिक्कामोर्तब केला आहे. परंतु, महाविकास आघाडीच्या पारड्यात केवळ 99 मतेच पडली. 107 आमदारांचा आकडा असतानाही महाविकास आघाडीची गाडी 99 वरच थांबली. कारण यावेळी कॉंग्रेसचे तब्बल आठ आमदार गैरहजर होते. यामुळे कॉंग्रेस महाविकास आघाडीची साथ सोडणार, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगत आहे.

बहुमत चाचणीला अशोक चव्हाणांची गैरहजेरी होती. सभागृहाचे कामकाज सुरु झाल्यानंतर सभागृहाचे दरवाजे 10 मिनीटे बंद करण्यात आली होते. यानंतर थोडासा उशीर झाल्यानं बहुमत चाचणीला मुकलो, असे स्पष्टीकरण अशोक चव्हाण यांनी दिले. मुद्दामून बहुमत चाचणी टाळलेली नाही, वेगळा अर्थ काढू नका, असेही आवाहन अशोक चव्हाण यांनी केले आहे. परंतु, बाकी सात नेत्यांचे काय, असा प्रश्न उभा राहत आहे.

दरम्यान, बहुमत चाचणीत शिंदे सरकार 164 मतांनी विजयी झाले. परंतु, महाविकास आघाडीला केवळ 99 मतेच मिळाली. तर, विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत 107 मते महाविकास आघाडीकडे होती. परंतु, कॉंग्रेसचे आज आठ आमदार अनुपस्थित असल्याने महाविकास आघाडीला आज 100 चाही आकडा ओलांडण्यात यश आले नाही. यामध्ये अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, संग्राम जगताप, अण्णा बनसोडे, निलेश लंके, झिशान सिद्दिकी, धीरज देशमुख, शिरीष चौधरी यांसारख्या नेत्यांचा समावेश होता. यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या असून कॉंग्रेस महाविकास आघाडीची साथ सोडणार अशी शक्यता वर्तविण्यात येत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com