'मोदी पक्ष पुन्हा देशाला अंधश्रद्धा,बुवाबाजीच्या विहिरीत ढकलतोय'

'मोदी पक्ष पुन्हा देशाला अंधश्रद्धा,बुवाबाजीच्या विहिरीत ढकलतोय'

संजय राऊतांचा सामना रोखठोकमधून भाजपवर टीकास्त्र

मुंबई : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात भाजप सावरकर गौरव यात्रा काढत आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सामना रोखठोकमधून जोरदार टीकास्त्र सोडले आहे. सावरकरांचा विचार विज्ञानवादीच होता. त्या विज्ञानवादाला मूठमाती देऊन ‘मोदी पक्ष’ पुन्हा देशाला अंधश्रद्धा, बुवाबाजीच्या विहिरीत ढकलत आहे. अशाने देश गुलामच होईल, असे संजय राऊत. यांनी म्हंटले आहे.

'मोदी पक्ष पुन्हा देशाला अंधश्रद्धा,बुवाबाजीच्या विहिरीत ढकलतोय'
केंद्रीय कायदमंत्र्यांचा अपघात; कारला ट्रकने मारली टक्कर

हिंदुस्थान गुलाम का झाला? यावर आतापर्यंत अनेक चर्चा घडल्या असतील, पण हिंदुस्थानने गुलामी का पत्करली याचे उत्तर देशातील आजच्या भाजप राजवटीत आहे. विज्ञानाची, आधुनिकतेची कास सोडून देशाला भोंदू बाबागिरीच्या मार्गाने नेणे हाच गुलामीचा मार्ग आहे. देशी लोकांत कमालीची वाढलेली अंधश्रद्धा, धर्मांधता, बुवागिरी यामुळे जनतेला गुलाम करून देश ताब्यात घेणे इंग्रजांना शक्य झाले. मोदी यांच्या नेतृत्वाखालचा भारतीय जनता पक्ष देश ताब्यात ठेवण्यासाठी तोच ब्रिटिश मार्ग अंगीकारत आहे. लोकांना बुवा, महाराज, अंगारे-धुपारे, मंदिर, मशीद, कथा वाचक, धर्म मेळे यांत गुंग ठेवून मूळ प्रश्नांवरून लक्ष विचलित करायचे व त्याच ‘धुंद’ वातावरणात निवडणुका जिंकायच्या. जाती व धर्मात भांडणे लावण्याचे काम इंग्रजांनी केले. लोकांना भांडत ठेवले व इंग्रज देश लुटत राहिले. आता वेगळे काय सुरू आहे, असा निशाणा त्यांनी भाजपवर साधला आहे.

वीर सावरकर हे अद्भुत क्रांतिकारक होते. ते हिंदुत्ववादी होते, पण हिंदुत्वाच्या नावाखालची बुवाबाजी त्यांना मान्य नव्हती. त्यांचा दृष्टिकोन विज्ञानवादी होता. त्यांना शस्त्रांचे सामर्थ्य मान्य होते. चीनपुढे नमते घेणारे लोक आज महाराष्ट्रात ‘सावरकर गौरव यात्रा’ काढतात हे अजब आहे. सावरकर गौरव यात्रा काढणे ही एकप्रकारे भोंदुगिरीच आहे. नरहर कुरुंदकर सावरकरांविषयी म्हणतात, ”सावरकर कठोर बुद्धिवादी, विज्ञाननिष्ठ व जडवादी होते. एकाही अंधश्रद्धेवर त्यांचा विश्वास नव्हता. माणूस म्हातारपणी धार्मिक होतो असे म्हणतात, पण सावरकरांच्या बाबतीत हे घडले नाही.

माणसाने कल्पिलेला देव काल्पनिक आणि मानवी आहे हे ते ठासून सांगत. गंगाजल कृपाळू आहे याचा अर्थ ते पापे धुऊन टाकते असा न करता ते जमीन सुपीक करते, असा होतो. याच गंगेला पूर आला, बोटी बुडाल्या म्हणजे लाखो गावे व माणसे नामशेष होतात. हे निसर्गाचे सावरकरांना माहीत होते. गाय ही माता असलीच तर बैलाची! माणसासाठी तो एक उपयुक्त पशू आहे आणि उपयोगी घोडा व इमानी कुत्रा या रांगेतच गाईला बसवावे लागेल, असे सावरकरांचे म्हणणे असे.

ग्रहणाच्या वेळी दान करावे, या पुण्याने राहू-केतूच्या विळख्यातून सूर्य, चंद्र सुटतात व गोमूत्राच्या प्राशनाने माणसाची पापे जातात, हा खुळचटपणा सावरकरांना मान्य नव्हता. सावरकर समजून घ्यावयाचे तर हा कठोर बुद्धिवाद समजून घेतला पाहिजे. नसता सावरकर नुसताच वंदनीय होतो, हे कुणी विसरू नये. सावरकरांनी हिंदुस्थान हिंदूंचा आहे, इतर कुणाच्या बापाचा नाही ही घोषणा केली, इतकेच आपणाला माहीत आहे, पण या घोषणेचा अर्थ काय? सावरकर म्हणतात, ही भूमी ज्यांना पवित्र आणि पितृभूमी वाटते, या राष्ट्रावर ज्यांची श्रद्धा आहे ते सर्व हिंदूच होत. हिंदू होण्यासाठी पुराण मानावे हे सावरकरांनी सांगितले नाही. हिंदू असण्यासाठी मांडी घालून नाक दाबावे का गुडघे मोडून निजावे हे सावरकरांनी सांगितले नाही. हिंदू होण्यासाठी या राष्ट्रावर प्रेम करावे इतकेच सांगून ते थांबले.” हे सावरकर गौरव यात्रावाल्यांना मान्य आहे काय, असा प्रश्नही संजय राऊतांनी विचारला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com