मुख्यमंत्री शिंदेंच्या भाषण सुरु असतानाच लोक गेले निघून; दमदाटी करून थांबवण्याचे प्रयत्न

मुख्यमंत्री शिंदेंच्या भाषण सुरु असतानाच लोक गेले निघून; दमदाटी करून थांबवण्याचे प्रयत्न

एकनाथ शिंदेनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली. परंतु, या भाषणाला लोक अक्षरशः कंटाळले दिसले.

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा बुधवारी बीकेसीवर पार पडला. या मेळाव्यानिमित्त राज्यभरातून रेकॉर्डब्रेक गर्दी झाली होती. यावेळी एकनाथ शिंदेनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली. परंतु, या भाषणाला लोक अक्षरशः कंटाळले दिसले. तर, काही लोक मुख्यमंत्री शिंदेंच्या भाषण सुरु असतानाच निघून जाऊ लागले. यावेळी शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी त्यांना दमदाटी करत थांबविण्याचा प्रयत्न केला. यादरम्यानचा व्हिडीओ आता समोर येत आहे.

एकनाथ शिंदे यांना भव्द-दिव्य मेळावा बुधवारी पार पडला. या मेळाव्यासाठी राज्यभरातून शिंदे गटातील नेत्यांनी लोकांना एसटीने आणि खासगी बसेसने मुंबईत आणले होते. मुख्यमंत्री शिंदेंच्या मेळाव्याला २ लाखाची गर्दी झाली होती, असा आकडा सांगण्यात येत आहे. यामुळे शिंदेंच्या दसरा मेळाव्याची अद्यापही चर्चा होताना पाहायला मिळते आहे. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी तब्बल 1 तास 28 मिनीटे भाषण केले. परंतु, शिंदे यांच्या भाषणाला लोकं कंटाळल्याचे दिसून आले. काही लोक तर भाषणामधूनच उठून जायला लागली.

या लोकांना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी विनंती करुन थांबवण्याचे प्रयत्न केले. तर काहींना दादागिरी करत जाऊ दिले नाही. तरीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू असताना मागील बाजूच्या खुर्च्या रिकाम्या झाल्या होत्या. एवढेच नव्हे तर भाषण सुरू असतानाच बीकेसी मैदान अर्ध्याहून अधिक रिकामे झाले होते, अशी दृश्ये व्हिडीओमध्ये दिसत आहेत. यामुळे शिंदेंच्या मेळाव्याला आले होते की? आणले होते? अशी चर्चा आता रंगताना पाहायला मिळत आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणात उध्दव ठाकरेंवर शरसंधान साधले. ते म्हणाले, शिवसेना ना उद्धव ठाकरेंची ना एकनाथ शिंदेंची ही शिवसेना फक्त आणि फक्त बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना. होय गद्दारी झाली? तुम्ही ज्या दिवशी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस सोबत युती केली तेव्हाच गद्दारी झाली. बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी झाली आहे. मला कटप्पा म्हणतात, पण त्यांना हे माहित नाही कटप्पा स्वाभिमानी होता, तुमच्या सारख्या दुटप्पी राजकारणी नव्हता. ही लोक भाड्यानी आणलेले लोक नाहीत, मनाने आलेले लोक आहेत, असेही शिंदेंनी म्हंटले होते.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com