'द केरला स्टोरी' चित्रपटाबाबत आव्हाडांच्या त्या विधानावर फडणवीसांचा इशारा; म्हणाले,कारवाई केली...
‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला. देशासह राज्यात या चित्रपटावरून प्रचंड गोंधळ सुरू आहे. या चित्रपटावर काहींनी आक्षेप घेतला तर काही लोकांनी या चित्रपटाला समर्थन केलं आहे. सोबतच राजकीय वर्तुळात देखील या चित्रपटावरून आरोप- प्रत्यारोप होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाबद्दल खळबळजनक वक्तव्य केलं. चित्रपट निर्मात्याला फासावर लटकावलं पाहिजे, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. यावरच प्रतिक्रिया देत उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कारवाईचा इशारा दिला आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
अमरावतीत प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, 'जितेंद्र आव्हाड जर असं बोलले असतील, तर अतिशय चुकीचं आहे. अशाप्रकारे बोलणं हे बेकायदेशीर आहे. प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि एका विशिष्ट समाजाचं लांगुलचालन करण्यासाठी ते अशाप्रकारे बोलतात. पण यामुळे इतर समाजात त्यांच्याबद्दल प्रचंड रोष आहे, विशेषत: हिंदू समाजात हे जितेंद्र आव्हाडांना कळत नाही. त्याचं वक्तव्य तपासून पाहिलं जाईल, त्यांच्या वक्तव्यात काहीही बेकायदेशीर आढळलं तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.' असा इशारा त्यांनी दिला.
काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड?
एक व्हिडिओ शेयर करत जितेंद्र आव्हाड म्हणाले की, 'द केरला स्टोरी'च्या चित्रपटातून समाजात प्रपोगंडा राबवण्यात येत आहे. केरळ राज्याची या चित्रपटातून बदनामी करण्यात आली आहे. तसेच हिंदू भगिनी मूर्ख असून त्यांना काही समजतच नाही, असं चित्र निर्माण केलं जात आहे. त्यामुळं अस चित्र निर्माण करणाऱ्या द केरला स्टोरीच्या दिग्दर्शकाला भरचौकात फाशीची शिक्षा देण्याची मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली होती.