जे लोक लोकशाहीची दुवाही देत, ते सभागृहात केवळ ४६ मिनीटं; फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा
मागील दोन आठवड्यापासून नागपूरमध्ये राज्याचे हिवाळी अधिवेशन पार पडत आहे. आज या अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत घेतली. यावेळी बोलताना त्यांनी विधिमंडळातील कामाबाबतही माहिती दिली. यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
रोज जे लोक लोकशाहीची दुवाही देत होते. राज्यात लोकशाहीविरोधी सरकार आहे, असा आरोप करतात. तेच लोकं संपूर्ण अधिवेशनात सभागृहात केवळ ४६ मिनीटं होते. त्यामुळे लोकशाहीवर त्यांचे किती प्रेम आहे. हे यावरून लक्षात येईल. आम्ही लोकशाही मानणारे लोकं आहोत. त्यामुळे या सभागृहाच्या माध्यमातून आम्ही सर्व प्रश्नांना न्याय देण्याचे काम आमच्या सरकारने केलं आहे. अशी टीका फडणवीस यांनी यावेळी केली.
पुढे ते म्हणाले की, विधिमंडळाचे अधिवेशन नुकताच पार पडले. या अधिवेशनादरम्यान मोठ्या प्रमाणात कामं पार पडली. सुरुवातीच्या काळात काहींनी बहिष्कार टाकला, सभागृह बंद पाडण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्यानंतर सकाळी ९ ते रात्री ११ पर्यंत सभागृह सातत्याने सुरू होतं. मी विरोधकांचे आभार मानतो की, त्यांनी सुरुवातीला जरी सभागृह बंद पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, नंतरच्या काळात त्यांनी अधिवेशनात सहभाग घेतला.अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.