त्यांनीच जनाची नाही, तर मनाची तरी लाज बाळगावी; फडणवीसांचे उध्दव ठाकरेंना प्रत्युत्तर

त्यांनीच जनाची नाही, तर मनाची तरी लाज बाळगावी; फडणवीसांचे उध्दव ठाकरेंना प्रत्युत्तर

वीज बिलाच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. या टीकेला आज देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे

मुंबई : वीज बिलाच्या मुद्द्यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी बुलढाण्याच्या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. या टीकेला आज देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. हे कुठल्या तोंडाने बोलत आहेत. जे बोलणारे आहेत त्यांनीच जनाची आणि मनाची ठेवली पाहिजे, असे प्रत्युत्तर फडणवीसांनी उध्दव ठाकरेंना दिले आहे. मंत्रालयात महात्मा फुलेंच्या तैलचित्राचं अनावरण करण्यात आल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महात्मा फुलेंचं योगदान अतुलनीय आहे. फुलेंच्या संघर्षामुळे वंचितांना अधिकार मिळाले. त्यांनी संघर्ष केला नसता तर महिलांना आणि वंचिताना अधिकार मिळाले नसते.

वीज बिल माफी करू मी कधीच म्हटलं नाही. कोरोना काळात मध्यप्रदेशने त्या काळापूर्ती वीज बिल माफ केले. मध्यप्रदेशसारखे पॅटर्न महाराष्ट्रात आणा, असे महाविकास आघाडी सरकार काळात म्हणालो होतो. तेव्हाच सरकार निर्दयी होते. हे कुठल्या तोंडाने बोलताय. जे बोलणारे त्यांनी जनाची आणि मनाची ठेवली पाहिजे. सत्तेत असताना विमा कंपनीवर मोर्चा काढत होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात विमा कंपनीला जास्त फायदा पोहचवत होते. सत्तेबाहेर वेगळे आणि सत्तेत वेगळे हे आता एक्स्पोज झाले.

राष्ट्रपुरुषांची सुरू असलेली बदनामी भाजप-काँग्रेसने त्वरित थांबवावी, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. यावर देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे काय बोलले मी ऐकले नाही. परंतु, ज्यांनी देश स्वातंत्र्यकरीता आणि देश घडविण्यासाठी काम केले आहे. त्यांच्याबद्दल कोणीही खालच्या स्तराचे कोणी बोलू नये, असे त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, बुलढाण्यातील सभेत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची एक ऑडिओ क्लिप ऐकवली. व ते म्हणाले, सावकारी पद्धतीने वीजबिल वसूल केले जात आहे. काय बोलत होते? मी तेव्हा मुख्यमंत्री होतो. देवेंद्रजी जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा, अशा शब्दांत उध्दव ठाकरेंनी फडणवीसांवर टीका केली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com