...म्हणून संजय राठोड यांना मंत्रिमंडळात घेतले; एकनाथ शिंदेंनी सांगितले कारण

...म्हणून संजय राठोड यांना मंत्रिमंडळात घेतले; एकनाथ शिंदेंनी सांगितले कारण

शिंदे सरकारचा मिनी मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला आहे. यावेळी संजय राठोड यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. यावर विरोधकांनी आता शिंदे सरकारला धारेवर धरले.

मुंबई : शिंदे सरकारच्या सत्ता स्थापनेनंतर सव्वा महिन्याने आज अखेर मिनी मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला आहे. यावेळी संजय राठोड यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी आता शिंदे सरकारला धारेवर धरले असून प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. याला आता स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले की, सर्वांना माहिती आहे की, पोलिसांनी त्या प्रकरणाचा तपास केला. त्या तपासात काहीच निष्पन्न झालं नाही. त्यामुळे त्यांना महाविकास आघाडी सरकारच्या काळातच क्लीन चिट देण्यात आली. म्हणून राठोडांचा मंत्रिमंडळात समावेश झाला आहे, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

यानंतरही कुणाचे काही विचार असेल, म्हणणं असेल तर नक्की सांगा, ते ऐकून घेतलं जाईल. लोकशाहीत प्रत्येकाला भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे, असेही शिंदे यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, संजय राठोड यांनी शपथ घेताच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत शिंदे सरकारला घरचा आहेर दिला. पुजा चव्हाणच्या मृत्युला कारणीभूत असणाऱ्या माजी मंत्री संजय राठोडला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्यांच्याविरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास लडेंगे, जितेंगे, असे चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com