शरद पवार गटाने निवडणूक आयोगासमोर केला 'हा' मोठा दावा
नवी दिल्ली : राष्ट्रवादी कुणाची यावर आज निवडणूक आयोगात सुनावणी पार पडली. यावेळी दोन्ही गटांमध्ये जोरदार युक्तिवाद झाले. आज अजित पवार गटावर बोगस शपथपत्रांचा आरोप शरद पवार गटाने केला आहे. तर, अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरेंनी सलग सुनावणी व्हावी अशी मागणी आयोगापुढे केली आहे. दरम्यान, पुढील सुनावणी 20 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
शिवसेना केस मध्ये दोन्ही बाजूंनी मिळून 20 लाखांच्या आसपास शपथपत्र दाखल होती. पण ती न पडताळताच निर्णय झालेला होता. निवडणूक आयोगाने शिवसेना केसप्रमाणे करू नये, शपथपत्र नीट न बघता निर्णय देऊ नये ही देखील शरद पवार गटाच्या वतीने विनंती करण्यात आली आहे. अजित पवार गटाच्या 20 हजार शपथ पत्रांचीच तपासणी केली तर 8900 शपथपत्र बोगस सापडले आहेत. या बोगस शपथपत्रांची विभागणी आम्ही 24 गटात केली आहे. काही शपथपत्रे मृतांच्या नावे, काही अल्पवयीन मुलांच्या नावे, काही अस्तित्वात नसलेली पदे तर काही ठिकाणी झोमॅटो सेल्स मॅनेजर म्हणून लिहिले आहे, असा दावा शरद पवार गटाने केला आहे.
आम्ही तपासणी केली तर 20 हजार बोगस शपथपत्रं सापडली. निवडणूक आयोगाने बघितली तर 50 हजार सापडतील, असेही शरद पवार गटाने म्हंटले आहे. दरम्यान, अजित पवार गटाकडून नीरज कौल आणि मणिंदर सिंग बाजू मांडली आहे. तर, शरद पवार गटाकडून अभिषेक मनू सिंघवी बाजू मांडली आङे.