विरोध करायचा आणि पुन्हा त्यांच्याच मांडीवर जाऊन बसायचं; महाजनांचा उध्दव ठाकरेंवर निशाणा
जळगाव : सावरकर आमचे दैवत आहे. त्यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही, असा इशारा उध्दव ठाकरे यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधींना मालेगाव सभेत दिला होता. यावरुन सत्ताधाऱ्यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली आहे. भाजप नेते गिरीश महाजन यांनीही उध्दव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. विरोध करायचा आणि पुन्हा त्यांच्याच मांडीवर जाऊन बसायचं असं उद्धव ठाकरेंकडून अपेक्षित नाही, असा टोला त्यांनी लगावला आहे.
राहुल गांधी यांची स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत दुटप्पी भूमिका असून उद्धव ठाकरेंनी त्यांना तंबी दिली पाहिजे व महाविकास आघाडीतून बाहेर पडले पाहिजे, असे वक्तव्य गिरीश महाजन यांनी केले आहे. विरोध करून त्यांच्याच मांडीवर जाऊन बसायचं असं उद्धव ठाकरेंकडून अपेक्षित नाही. उद्धव ठाकरेंनी आपले सर्व तत्व हिंदुत्व गुंडाळून ठेवले असून त्यांना सत्तेपुढे काही दिसत नसल्याचीही टीका त्यांनी केली आहे.
तर, उद्धव ठाकरे यांचे भाषण हे शिळ्या कढीला ऊत आल्यासारखे असून खुर्चीच्या छोट्याशा सुखासाठी उद्धव ठाकरेंनी शिवसेना संपायचं काम केलं आहे. अडीच वर्षात उद्धव ठाकरे मंत्रालयाची पायरी चढली नाही. शेतकऱ्यांच्या बांधावर गेले नाही. मात्र, खोटं बोल पण रेटून बोल, असा प्रकार उद्धव ठाकरेंचा सुरू असल्याचे म्हणत गिरीश महाजनांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उध्दव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले आहे. उध्दव ठाकरेंची ही भूमिका दुटप्पी आहे. सावरकरांचे हिंदुत्व मान्य असेल तर कर्तव्यातून दाखवावे. बाळासाहेब असते तर राहुल गांधींना जोडे मारले असते. तसेच, निमूटपणे सहन करणाऱ्यांना जोडे मारले असते, असे एकनाथ शिंदे यांनी म्हंटले आहे.