...तर मी पुन्हा तुम्हाला शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन : उध्दव ठाकरे

...तर मी पुन्हा तुम्हाला शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन : उध्दव ठाकरे

उध्दव ठाकरे यांचा शिंदे गटावर दसरा मेळाव्यात घणाघात

मुंबई : शिवसेनेचा आज शिवाजी पार्कवर दसरा मेळावा पार पडला आहे. यावेळी उध्दव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघात केला. अंगावर आता आलेलाच आहात, आता आपल्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांना शिंगावर घ्यावं लागेल. प्रत्येक निवडणुकीत त्यांना पाणी पाजावं लागेल. तुम्ही साथ द्या, मी पुन्हा तुम्हाला शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन, असा निर्धार उध्दव ठाकरे यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, रावणाने संन्याशाचं रुप घेऊन सीतेचं हरण केलं होतं, तसं हे तोतये बाळासाहेबांचा चेहरा लावून शिवसेना हडपायला आले आहेत. शिवाजी पार्क मिळू नये म्हणून हे मागे लागले. कोर्टात निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्री म्हणतात जर मी लक्ष घातलं असतं, तर यांना हे मैदान मिळालं नसतं. काय बापाची पेंड आहे तुमच्या? गद्दार तर आहेतच. आता धनुष्यबाण हवं, बाळासाहेब हवेत, शिवाजी पार्क हवं.. घेऊन जाणार कुठे, असा सवालही त्यांनी विचारला आहे.

माझं आव्हान आहे. एकच व्यासपीठ. तुम्ही भाजपाची स्क्रिप्ट न घेता भाषण करून दाखवायचं. मी मुख्यमंत्री असताना ४-५ पत्रकार परिषदा झाल्या. माझ्या बाजूला अजित पवार बसायचे. कधीच त्यांनी माझ्यासमोरचा माईक खेचला नव्हता. माझ्या कानात माझं उत्तर सांगितलं नव्हतं. काँग्रेस-राष्ट्रवादीनं मान-सन्मान देऊन आपली सोबत केली आहे. सरकार झालं, तेव्हा अनेकांनी सांगितलं की ते काँग्रेस बघा. काहीतरी गडबड आहे. शरद पवार तुम्हाला माहिती आहे. नीट लक्ष ठेवा हां. अडीच वर्ष त्यांच्याकडे लक्ष ठेवता ठेवता हेच निघाले. मग गद्दार कोण?

आम्ही काँग्रेससोबत गेलो, म्हणून हिंदुत्व सोडलं म्हणता. मग पाच वर्ष आम्ही तुमच्यासोबत होतो. त्यात कसं जाऊन अशोक चव्हाणांना जाऊन भेटले होते, हा त्यांनी गौप्यस्फोट केला आहेच. पण आम्ही सोबत असतानाही औरंगाबादचं संभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशीव केलं नाही. पण ते काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत असताना मी करून दाखवलं आहे. दुर्दैवाने त्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत आपल्याकडून मी, सुभाष देसाई, आदित्य आणि अनिल परब हेच होते. ज्यावेळी नामकरणाचा ठराव आला, त्याच्या दुसऱ्याच क्षणाला काँग्रेस-राष्ट्रवादीनं हो म्हटलं आहे. मग काय आम्ही हिंदुत्व सोडलं? उलट त्यांना घेऊन आम्ही हिंदुत्व वाढवत होतो, असे त्यांनी म्हंटले आहे.

यांच्या घोषणांची अतीवृष्टी आणि अंमलबजावणीचा दुष्काळ असं हे सरकार आहे. म्हणून मला चिंता नाहीये. मी लढणाऱ्या पित्याचा लढणारा मुलगा आहे. पहिल्या दिवसापासून मी शिवसेनेवर आलेली संकटं बघत मोठा झालो आहे. आजही माझ्या हातात काहीच नाहीये. माझ्यासोबत चालायचं असेल, तर निखाऱ्यावर चालण्याची तयारी हवी. जसं मी माझ्या पित्याला वचन दिलं होतं की मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन, तसंच मी तुम्हाला वचन देतोय.. तुमच्या मनातल्या या आगीतून उद्या हिंदुत्वाचा वणवा पेटणार आहे. त्यात सगळ्या गद्दारांची गद्दारी भस्मसात होणार आहे. तुम्ही साथ द्या, मी पुन्हा तुम्हाला शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन, असे आवाहन उध्दव ठाकरेंनी केले आहे.

एका अर्थी झालं ते बरं झालं. बांडगुळं सगळी छाटली गेली. ही बांडगुळं आपण आपल्या फांद्यांवर पोसत होतो. पण त्यांच्या लक्षात आलं नाही की बांडगुळांची मुळं फांद्यांमध्ये असतात, पण फांद्यांची मुळं जमीनीत असतात. बांडगुळाला स्वत:ची ओळख नसते. तो सांगू शकत नाही की तो बांडगूळ आहे. अंगावर आता आलेलाच आहात, आता आपल्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांना शिंगावर घ्यावं लागेल. प्रत्येक निवडणुकीत त्यांना पाणी पाजावं लागेल, असा इशाराही उध्दव ठाकरेंनी शिंदे गटाला दिला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com