अमरावतीत शिवव्याख्याते व खासदार अनिल बोंडेंमध्ये राडा
सुरज दहाट| अमरावती: सध्या राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या घडामोडी घडताना दिसत आहे. त्यातच दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरून सतत वाद निर्माण केले जात आहेत, तर काही वेळा चुकीचं वर्णन केल्यावरही वाद होत राहतात. त्यातच अमरावतीत 19 फेब्रुवारी शिवाजी महाराज जयंतीला आयोजित केलेल्या व्य़ाख्यान मालिकेत देखील असाच वाद पाहायला मिळाला. यात भाजपाचे खासदार अनिल बोंडे आणि शिवव्याख्याते तुषार उमाळे एकमेकांसमोर उभे ठाकले, तसेच एकमेकांशी कारे तुरे देखील वर आलेले दिसले. यासंबंधी एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
नेमकं काय घडलं?
तुषार उमाळे बोलताना त्यांनी शिवाजी महाराजांची प्रतिमा मुस्लिम विरोधी दाखविण्यासाठी कसे प्रयत्न केले जातात हे समजावत असताना खासदार अनिल बोंडे यांनी उभे राहून हे शहाणपण बंद कर,मूर्ख आहे का? असं उच्चारण केलं. यावेळी मंचावर असलेले मान्यवर उठून गेलेत. दरम्यान, काहीसा गोंधळ निर्माण झाला होता.यावेळी कार्यक्रमात शिवाजी महाराज यांच्या विचारांवर प्रकाश टाकताना बोंडे व व्याख्यात्या मध्ये वाद झाला सद्या हा व्हिडिओ सोशल माध्यमावर चांगलाच गाजतो आहे.
काय म्हणाले तुषार उमाळे?
महाराजांना कोणत्या पद्धतीने प्रेजेंट करायचं हेच आमच्या लोकांना कळलेलं नाही. शिवाजी महाराज उठले की, माँ साहेब सांगायचे, महाराज नाष्टा करायचा आहे, दोन मुसलमान कापून या. महाराज दोन मुसलमान कापून आणले. मग नाष्टा झाला. दुपारचे बारा वाजले. आता जेवायची वेळ झालीय. महाराज मुसलमान कापून या. गेले, चार मुसलमान कापून आले आणि जेवायला आले. आता संध्याकाळ झाली, सहा तरी होऊन जाऊद्या. महाराज गेले आणि सहा मुसलमान खपाखप कापून आले. महाराजांना दुसरा धंदाच नव्हता. उठलं की फक्त मुसलमानच मारायचे. महाराजांना दुसरा काही उद्योगच नव्हता अशी जणू काही. असे ते भाषणात म्हणाले होते.