शिंदेंना मेळाव्याची गरज वाटत असेल तर...; जयंत पाटलांचा टोला

शिंदेंना मेळाव्याची गरज वाटत असेल तर...; जयंत पाटलांचा टोला

दसरा मेळाव्याच्या वादात जयंत पाटील यांची उडी

अमोल धर्माधिकारी | पुणे : राज्यात दसरा मेळव्यावरुन शिवसेना आणि शिंदे गट समोरासमोर आले आहेत. सत्ताधार आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. अशात आज शिवाजी पार्क मैदानासाठी महापालिकेकडून कायदा व सुरक्षेचे कारण पुढे करत अद्याप दोन्ही गटाला परवानगी देण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस जयंत पाटील यांनी शिंदे सरकारावर निशाणा साधला आहे.

जयंत पाटील म्हणाले की, शिवाजी पार्कवर आतापर्यंत शिवसेना दसरा मेळावा घेत होती. त्याचा मेळावा खरा आहे. शिंदे यांना मेळावा करायची गरज वाटत असेल तर त्यांनी दुसरीकडे करावा. पारंपरिक शिवसेनेला डावलणे योग्य नाही, असा सल्लाही त्यांनी शिंदे गटाला दिला आहे.

पक्ष सोडल्याने प्रताप सरनाईक यांना क्लिन चिट मिळाली, अस म्हणतात. ईडीने काही महिन्यापूर्वी कारवाई केली. आता त्यांनी क्लिन चिट दिली. राजकीय विचार बदलले की ईडी येत नाही. त्यांना विचारलं पाहिजे एनसीपीचे कोण आमदार संपर्कात आहेत, असा मिश्कील टोला त्यांनी शिंदे सरकारला लगावला आहे.

मनसे अध्यश्र राज ठाकरे यांच्या दौऱ्यावर जयंत पाटील यांनी राज ठाकरे स्वतःच्या पक्षाचे काम करत आहेत. चांगलं आहे, असे म्हंटले आहे. तसेच, राहुल गांधी यांची रॅली जोर धरत आहे. त्यांना लोकांचा पाठींबा मिळत आहे. आमचा पाठिंबा द्यायचा की नाही यावर अजून पक्षात चर्चा झालली नाही, अशी माहितीही त्यांनी दिली, स्थानिक स्वराज संस्था निवडणूक घेण्यास सरकार घाबरले आहे. स्थानिक स्तरावरचे नेते एकत्रित लढण्यावर विचार करतील, असेही जयंत पाटील यांनी सांगितले आहे.

दरम्यान, शिवाजी पार्क मैदानासाठी परवानगी न दिल्यानं दसरा मेळाव्यासाठी पर्यायी मैदान म्हणून दोन्ही गटांकडून बीकेसी येथील मैदानासाठी एमएमआरडीकडे अर्ज करण्यात आले होते. मात्र ,एमएमआरडीएने शिंदे गटाने अर्ज केलेल्या मैदानासाठी परवानगी देताना उद्धव ठाकरे गटाचा परवानगी अर्ज फेटाळला आहे. याउलट शिवसेनाही आता शिवतीर्थ अर्थात शिवाजी पार्क मैदानावरच दसरा मेळावा घेण्यावर ठाम झाली आहे. त्यामुळे दसरा मेळाव्या वरून आता मुंबईत मोठे रामायण होण्याची शक्यता आहे.

Lokshahi
www.lokshahi.com