Jayant Patil : मोदीजी, आपण फित कापून खुशाल श्रेय घ्यावे, कारण...

Jayant Patil : मोदीजी, आपण फित कापून खुशाल श्रेय घ्यावे, कारण...

पंतप्रधान मोदी आज शिर्डी दौऱ्यावर येत आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

पंतप्रधान मोदी आज शिर्डी दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या हस्ते विविध विकासकामांच शुभारंभ होणार आहे. अहमदनगरच्या आयुष रुग्णालयाचं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ई-प्रणालीद्वारे लोकार्पण होणार आहे. निळवंडे धरणाच्या कॅनलचं लोकार्पण करण्यात येणार आहे. तसेच शिर्डीजवळील काकडी गावात पंतप्रधान मोदींची जनसभा पार पडणार आहे.

याच पार्श्वभूमीवर आता जयंत पाटील यांनी ट्विट केलं आहे. जयंत पाटील म्हणाले की, मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रातील शिर्डी येथे विविध विकास कामांच्या पायाभरणी समारंभासाठी उपस्थित राहणार आहेत. यामध्ये निळवंडे धरणाच्या कालव्याचे लोकार्पण सुद्धा करण्यात येणार असल्याचे समजले. दुष्काळाच्या छायेत राहणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील गावांना अखेर दिलासा मिळणार आहे, याचा आनंद मला होत आहे. १९७० ते २०१९ पर्यंत निळवंडे धरणाच्या कालव्याच्या कामासाठी सुमारे ११०० कोटी रुपये खर्च करून केवळ ४५ टक्के काम पूर्ण झाले होते. महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांत कालखंडात जलसंपदा विभागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सुमारे ९०० कोटींचा निधी देऊन मी या कालव्याचे ९० टक्के काम पूर्ण केले.

या प्रकल्पाचे काम गुणवत्तापूर्ण व्हावे यासाठी मी स्वतः या कार्याची तीनदा जाऊन पाहणी केली. महाविकास आघाडी मधील तेथील लोकप्रतिनिधींनी या कामात बारकाईने लक्ष घातले. कोरोनोच्या काळात सरकारी तिजोरीवर आर्थिक भार होता, मात्र त्या परिस्थितीतही आम्ही विकास कामे थांबवली नाहीत. निळवंडे धरणाच्या कालव्याचे काम एका निर्णायक टप्प्यावर आणून ठेवले. मोदीजी, आपण फित कापून खुशाल श्रेय घ्यावे. कारण आमच्या शेतकरी बांधवांना, माय भगिनींना आता पाण्यासाठी वणवण करावी लागणार नाही, ह्यात आमचा खरा आनंद सामावलेला आहे.असे जयंत पाटील म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com