‘नव्या पुण्याच्या शिल्पकारांनी‘ पाच वर्षात केलेला विकास रस्त्यावरून वाहतोय; जयंत पाटलांचा भाजपला टोला

‘नव्या पुण्याच्या शिल्पकारांनी‘ पाच वर्षात केलेला विकास रस्त्यावरून वाहतोय; जयंत पाटलांचा भाजपला टोला

पुण्याला पावसानं चांगलेचं झोडपून काढलं. यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांच स्वरुप आले होते. यावरुन जयंत पाटील यांनी भाजवर निशाणा साधला आहे.

पुणे : राज्यात परतीच्या पावसानं धुमाकूळ घातला आहे. त्यातच पुण्याला चांगलेचं झोडपून काढलं आहे. यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांच स्वरुप आल्याचं पाहायला मिळालं. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी भाजपचा नव्या पुण्याच्या शिल्पकार असा उल्लेख केली आहे.

जयंत पाटील म्हणाले की, पुणे शहरात अक्षरशः रस्त्यांच्या नद्या बनलेल्या आहेत. गेली २४ तास नागरिकांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. गेली पाच वर्ष पुणे महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता होती. ‘नव्या पुण्याच्या शिल्पकारांनी‘ पाच वर्ष पुण्याचा केलेला विकास रस्त्यावरून वाहत आहे, अशी टीका त्यांनी भाजपवर केली आहे. पुण्यासारख्या जागतिक पातळीवर महत्वाच्या असणाऱ्या शहरात असे चित्र निर्माण होणे हे अत्यंत दुर्दैवी आहे, अशी खंतदेखील जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, पुण्यात ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार उडवून दिला होता. सर्व रस्ते पाण्याखाली गेले होते. अनेक घरे, सोसायट्यांमध्ये पाणी शिरले होते. झाडे, फांद्या आणि भिंती कोसळण्याच्या घटनाही घडल्या. रात्री घराबाहेर असलेले अनेक नागरिक ठिकठिकाणी अडकून पडले. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह झालेल्या या धुवाधार पावसाने पुणेकरांमध्ये अक्षरश: धडकी भरवली. रात्री साडेनऊच्या सुमारास सुरू झालेला पाऊस रात्री बारापर्यंत कायम होता. शहरासह जिल्ह्यातही बहुतांश भागांत मुसळधार पाऊस झाला. तर हवामान विभागने आणखी दोन दिवस पावसाची शक्यता वर्तवली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com