jayant Patil
jayant PatilTeam Lokshahi

जयंत पाटीलांचे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना इशारा; म्हणाले, भावनांचा गैरवापर...

सीमा भागातील गावांची प्रकरणे न्याय प्रविष्ट असल्याने कर्नाटकातील मंडळी दिशाभूल करण्याचे काम करत आहे.
Published by :
Sagar Pradhan

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी काल बंगळुरुमध्ये एका कार्यक्रमात जत तालुक्यातील गावावरुन धक्कादायक वक्तव्य केले. जत तालुक्यातील ४० गावांवर दावा करण्याच्या तयारीत आम्ही आहोत, असा दावा मुख्यमंत्री बोम्मई यांनी केला. त्यानंतर राज्यात एकच राजकीय गदारोळ सुरु झाला आहे. यावरच आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले जयंत पाटील?

सीमा भागातील गावांची प्रकरणे न्याय प्रविष्ट असल्याने कर्नाटकातील मंडळी दिशाभूल करण्याचे काम करत आहे. आमच्या जत तालुक्यातील लोकांच्या भावनांचा गैरवापर कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी करू नये, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिला.

जत तालुक्यातील 65 गावे ही दुष्काळी होती. म्हैसाळच्या जुन्या योजनेचे पाणी तिथे जात नव्हते. या गावांना पाणी मिळावे यासाठी येथील नागरिक अनेक वर्षांपासून मागणी करत होते. महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर जलसंपदा मंत्री या नात्याने 11 ऑगस्ट 2021 ला वारणा नदीच्या पाणी वाटपाचे फेरनियोजन करण्यास मान्यता दिली आणि या फेरनियोजनामुळे अतिरिक्त 6 टीएमसी पाणी उपलब्ध झाले. म्हैसाळ प्रकल्प माध्यमातून या 64 गावांना दिलासा देण्याचे काम आम्ही केले. मी स्वतः या प्रकल्पाचा पाठपुरावा केला आणि फार कमी काळात हा प्रकल्प अंतिम टप्प्यात आणला. कोरोनामुळे या प्रकल्पाचे काम झाले नाही असे म्हणणे फार चुकीचे आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

या प्रकल्पाबाबत महाविकास आघाडीने कोणतीही दिरंगाई केली नाही. प्रकल्प शेवटच्या टप्प्यात असून मंत्रिमंडळाने प्रकल्प पुढे घ्यावा आणि त्याला मान्यता द्यावी व प्रकल्प सुरू करून टाकावा असेही जयंत पाटील यांनी सरकारला सांगितले. आम्हाला पाणी मिळत नाही म्हणून आम्हाला कर्नाटक राज्यात जाण्याची परवानगी द्यावी, अशी भूमिका 2016 साली येथील ग्रामस्थांनी मांडली होती. आज या गावकऱ्यांची तशी कोणतीही भावना नाही. जतचे ग्रामस्थ कर्नाटकाच्या कारस्थानाला बळी पडणार नाही असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com