अजित पवारांचं राज्यातील जनतेला पत्र; जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया म्हणाले...

अजित पवारांचं राज्यातील जनतेला पत्र; जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया म्हणाले...

अजित पवार यांनी राज्यातील जनतेला पत्र लिहिलं आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

अजित पवार यांनी राज्यातील जनतेला पत्र लिहिलं आहे. या पत्रावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, सत्ता हेच सर्वस्व आहे. हीच अजितदादांची भूमिका आहे. त्यासाठी कोणाचीही साथसंगत करावी, हे त्यांच्या कालच्या पत्रातून सिद्ध झाले. ज्या पत्राला ते आपली सविस्तर भूमिका म्हणत आहेत. त्यांनी या पत्रात साधारणतः दहा परिच्छेदांमध्ये आपली भूमिका मांडली आहे. आपली भूमिका मांडताना त्यांनी स्पष्ट केले आहे की, सत्तेशिवाय राहण्यात काहीच अर्थ नसतो. सत्ता असेल तरच विकास होतो; आणि हे बोलत असताना त्यांच्या लक्षात येत नाही की, ज्यांनी त्यांना राजकारणात आणले; "अपघाताने" असे ते म्हणतात. ते मात्र अनेक वर्ष विरोधी पक्षात राहिले. अन् ते विरोधी पक्षात असतानाच राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पातळीवरील नेते त्यांनी केलेला विकास पाहण्यासाठी बारामतीत आले होते.

साध्यासोप्या भाषेत एखाद्याला तत्त्वनिष्ठ आणि वैचारिक विरोध करण्यासाठी वैचारिक बांधिलकी लागते. ती नसल्यानेच, 'मला विकास करायचा आहे असे म्हणत मी कोणाचाही हात पकडून सत्तेत जाऊ शकतो' , असेच त्यांना म्हणावे लागते. उशिरा का होई ना, आम्ही कोणावरही वैयक्तिक टीकाटीप्पणी करणार नाही, असे त्यांनी शेवटी लिहिलंय. हीच गोष्ट काही महिन्यांपूर्वी सुचली असती तर आदरणीय शरद पवार साहेब आणि संसदरत्न खा. सुप्रियाताई सुळे यांच्याविरोधातील वैयक्तिक टीकाटीप्पणी झाली नसती. आजही साहेब असोत अगर सुप्रियाताई असोत, यांनी अजित पवार यांच्याविरोधात एकही वाक्य उच्चारलेले नाही. सुप्रियाताई आपली भूमिका मांडताना म्हणतात की, 'अजितदादाविषयी आदराची भावना माझ्या मनात असते'. संपूर्ण जून महिना ते पाच जुलैपर्यंत आदरणीय शरद पवार साहेब यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात आणण्यासाठी किती मेहनत घेतली, हे महाराष्ट्र विसरलेला नाही. विरोधात राहून विकास होत नाही, असे जेव्हा ते म्हणतात. तेव्हा त्यांना एक आठवण करून द्याविशी वाटते की, आता त्यांच्यासोबत असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे १४ वर्ष सातत्याने विरोधी पक्षात राहिले. पण, २०१४ साली ते मुख्यमंत्री झाले. हे मान्यच करावे लागेल की सन २०१४ साली झालेला आघाडीचा पराभवाचे श्रेय जेवढे एकनाथ खडसे यांना द्यावे लागेल, तेवढेच ते देवेंद्र फडणवीस यांनाही द्यावे लागेल. त्यांना कधीच वाटले नाही की आपण काँग्रेसचा मार्ग धरावा. ते त्यांची विचारधारा सोडायला तयार नाहीत. ते ३८० आणि समान नागरी कायदा हे आपले विचार कधीच सोडणार नाहीत, असे ते आजही म्हणत आहेत. कमीत कमी मित्राकडून अजित पवार काही शिकले असते तरी बरी झालं असतं.

तुम्हाला जो अपघात झाला आणि महाराष्ट्राला एका युवकाची गरज आहे, असे जे तुमचे म्हणणे आहे. पण, मला असे वाटते की, तुमच्यापेक्षा अनेक श्रेष्ठ युवक होते की ते सतरंजा उचलण्याचे आणि पोस्टर लावण्याचे काम करीत होते. तुमच्याच वयाचे जयंतराव पाटील; तुमच्याच वयाचे स्व. आर. आरा. पाटील हे अपघातातून पुढे आले, असे त्यांचे तरी म्हणणे नाही. आपण भाग्यवान आहात, आपलाच अपघात झाला आणि आपण भरारी घेतलीत. असा अपघात महाराष्ट्रातील प्रत्येक तरूणाच्या आयुष्यात होवो, एवढीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना असेल! वाईट याच गोष्टीचे वाटते की, ज्या घराण्यात वैचारिक अधिष्ठान आहे. त्या घराण्यात सत्ता हे सर्वस्व मानणारे जन्माला येतात. महाराष्ट्राने अनेक विरोधी पक्ष नेते पाहिले... विरोधी पक्षात काम करणारे आमदार पाहिले. जे कधीच सत्तेच्या वर्तुळात गेले नाहीत. पण, आजही महाराष्ट्र त्यांच्याकडे सन्मानानेच बघतो. लोककल्याणकारी राज्य निर्माण करताना आपल्या तत्त्वाशी तडजोड न करता संघर्ष करायचा अन् लोकांचं भलं करण्याचा मार्ग निवडावा, अशी साधारण संकल्पना लोकशाहीत असते. मात्र, ज्यांनी ठरवलंय की कंबरेचे बांधलेले डोक्याला गुंडाळायचे, त्यांना आता काय सांगायचे? असो, तुम्हाला तुमची सत्ता लखलाभ! उगाच कारण नसताना मोठे वैचारिक अधिष्ठान असल्यासारख्या भूमिका मांडू नका. सत्तेसाठी कोणासोबतही साथसंगत करण्याची तुमची तयारी आहे, हेच तुम्ही स्पष्ट केलंत. बरं झालं, महाराष्ट्राला निदान ते तरी कळलं . पण, उद्या जर महाविकास आघाडीची सत्ता आली तर परत सिल्वर ओकवर जाऊन , "विकासासाठी मी तुमच्यासोबत येतोय", असे म्हणालायही हे कमी करणार नाहीत. कारण सत्ता असेल तरच विकास होईल, असे गणित ते मांडतील. जनतेने यांच्यावर किती विश्वास ठेवायचा ते जनतेणीच ठरवावे. असे आव्हाड म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com