...तर आम्ही आपल्या बाजूने उभे राहू; आव्हाडांची शिंदेंना ऑफर?
मुंबई : वर्षभरापासून मला चेकमेट करायचा प्रयत्न केला जात आहे, असे सूचक विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यावर आज राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तुम्हांला चेकमेट करण्याचा प्रयत्न कोण करीत आहे तेवढं सांगा आम्ही आपल्या बाजूने उभे राहू, असे आव्हाडांनी म्हंटले आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, मला राजकारणातून चेकमेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. राजकारण सरळ मार्गाने करायचं असतं उंटाची तिरकी चाल, घोड्याची अडीच घरं हे सगळं बुद्धिबळात चालतं. आयुष्यात नाही, असा टोला आव्हाडांनी शिंदेंना लगावला आहे. तर, तुम्हांला चेकमेट करण्याचा प्रयत्न कोण करीत आहे तेवढं सांगा आम्ही आपल्या बाजूने उभे राहू, अशी ऑफरच त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली आहे.
काय म्हणाले होते एकनाथ शिंदे?
आम्हालाही अनेकदा विरोधकांशी एकाचवेळी मुकाबला करावा लागतो. त्यात काही तिरक्या चालीचे उंट असतात काही अडीच घरे चालणारे घोडे असतात काही हत्ती असतात एकमेकांना चेकमेट करण्यासाठी तयारी करत असतात. गेल्या एक वर्षापासून अनेक जण चेकमेट करण्यासाठी प्रयत्न करत आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले होते.