Kasba Peth, Chinchwad Bypolls : राज ठाकरेंचे मविआला आवाहन; ...तर जनताही सहानभूती दाखवणार नाही

Kasba Peth, Chinchwad Bypolls : राज ठाकरेंचे मविआला आवाहन; ...तर जनताही सहानभूती दाखवणार नाही

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महाविकास आघा़डीला पत्र लिहीत व्यक्त केली इच्छा

मुंबई : भाजप आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने कसबा पेठ आणि पिंपरी-चिंचवडची जागा रिक्त झाली आहे. या जागेवर पोटनिवडणुकीची तारीख जाहीर झाली भाजपने उमेदवार जाहीर केले आहे. तर, महाविकास आघाडीनेही निवडणूक लढण्याची तयारी सुरु केली आहे. यामुळे पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस विरुध्द महाविकास आघाडी असा सामना रंगण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. अशातच, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पत्र लिहीत कसबा आणि चिंचवड येथील पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी इच्छा व्यक्त केली आहे.

काय आहे राज ठाकरेंचे पत्र?

महाराष्ट्र विधानसभेच्या २ आमदारांच नुकतंच दुःखद निधन झालं. ह्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिडणूका होत आहेत. मी अगदी सुरुवातीपासून ह्या मताचा आहे की, जेंव्हा एखाद्या विद्यमान लोकप्रतिनिधीचं निधन होतं तेंव्हा तिथे होणारी पोटनिवडणूक शक्यतो बिनविरोध करावी. कारण मुळात जसा त्या विधानसभेतील कौल लोकप्रतिनिधीला असतो, तसाच कौल त्याच्या पक्षाला देखील असतो. अनेकदा त्या पोटनिवडणुकीत उमेदवार हा मृत व्यक्तीच्या घरातील असतो, अशावेळेस पक्षाने जर मृत व्यक्तीच्या घरातील उमेदवार दिला असेल तर, त्या उमेदवाराला बिनविरोध निवडून देणं ही एक प्रकारे, राजकीय संस्कृतीने त्या निधन झालेल्या व्यक्तीला श्रद्धांजलीच ठरणार नाही का? आणि ही प्रगल्भता महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन नाही. अर्थात उमेदवार जर निधन पावलेल्या लोकप्रतिनिधीच्या घरातील नसेल तर, जनता देखील सहानभूती दाखवेलच असं नाही.

अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या वेळेस, दिवंगत आमदार रमेश लटके ह्यांच्या पत्नी शिवसेनेच्या तिकिटावर उभ्या होत्या, त्यावेळेस मी देवेंद्र फडणवीस ह्यांना निवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन केलं होतं. ज्याला सकारात्मक प्रतिसाद देत, त्यांनी ती निवडणूक बिनविरोध होऊ दिली. आता पुन्हा पिंपरी-चिंचवड आणि कसबा विधानसभांमध्ये पोटनिवडणूका होत आहेत. जो उमदेपणा भारतीय जनता पक्षाने दाखवला तोच उमदेपणा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील दाखवावा. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती प्रगल्भ आहे हे देशाला दाखवून देण्याची संधी आपल्याला सर्वाना आहे. हीच नाही तर एकूणच अशा दुःखद घटनांमुळे होणाऱ्या पोटनिवडणुका बिनविरोध कराव्यात ही इच्छा, असे राज ठाकरे यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com